पालिकेची ‘मिशन’ प्लास्टिकमुक्ती

By Admin | Published: June 27, 2017 12:08 AM2017-06-27T00:08:03+5:302017-06-27T00:08:03+5:30

महापालिकेने प्लास्टिकमुक्त अमरावती शहर करण्यासाठी कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.

Plastic 'Mission' Plastic Removal | पालिकेची ‘मिशन’ प्लास्टिकमुक्ती

पालिकेची ‘मिशन’ प्लास्टिकमुक्ती

googlenewsNext

शिवटेकडीपासून सुरूवात : व्यावसायिकांविरूद्ध महापालिकेची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेने प्लास्टिकमुक्त अमरावती शहर करण्यासाठी कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी आता होलसेल व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास थेट पाच हजार रूपये दंड आकारण्यात येईल. या कारवाईतून आतापर्यंत सव्वा लाख रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय शिवटेकडीवर मोहीम राबवून प्लास्टिकमुक्तीचा निर्धार करण्यात आला आहे. त्यासाठी तरूणाईला साद घालण्यात आली आहे.
एकीकडे प्लास्टिकच्या घातक परिणामांविषयी समाजात जागृती केली जात असतानाही व्यावसायिक प्रतिष्ठानांमधून बिनदिक्कतपणे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅग वापरल्या जातात. त्यांच्यावर मागील आठवडाभरापासून कारवाईचा दंडुका उगारण्यात येत आहे.
इंदूरच्या धर्तीवर शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी प्लास्टिक कॅरिबॅग व्यवस्थापन व हाताळणी समिती कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य व स्वच्छता विभागाच्या अधिनस्थ यंत्रणेची मदत घेतली जात आहे. आयुक्त हेमंत पवार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ.अजय जाधव व त्यांची टीम प्लास्टिकमुक्ती मोहीम राबवित आहे.
याशिवाय डस्टबिन न ठेवणाऱ्या प्रतिष्ठानधारकांना तंबी देऊन त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे. आरोग्य विभागाकडून कारवाई होत असली तरी प्लास्टिकचा वापर थांबत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बंदी असलेले प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानदारांविरूद्ध कारवाईसाठी पथकांची संख्या वाढविली जाणार आहे. प्लास्टिकच्या वापरकर्त्यांवर दंडात्मक कारवाईसोबत जनजागृतीच्या पर्यायावर विचार सुरू आहे. दंडाच्या रकमेमधून जनजागृतीसाठी लागणारे साहित्य खरेदी केले जाणार आहे. शहरातील काही ठिकाणे ‘नो प्लास्टिक झोन’ जाहीर करण्याची मागणी समोर आली असून त्यावरही प्रशासनाकडून विचार केला जात आहे. दरम्यान दुकानदाराकडे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या आढळल्यास पहिल्यांदा पाच हजारांचा, दुसऱ्यांदा १० हजार तर तिसऱ्यांदा २५ हजारांचा दंड आकारला जाईल.

तरूणाईला साद
महापालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी प्लास्टिकमुक्तीचा संकल्प सोडला आहे. या मोहिमेची सुरूवात शिवटेकडीवरून करण्यात आली. महापौर संजय नरवणे, स्थायी सभापती तुषार भारतीय, नगरसेवक दिनेश बूब यांच्यासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी शिवटेकडीवरील प्लास्टिकचे संकलन केले. यात महाविद्यालयीन तरूण-तरूणींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

लोकसहभागाचे आवाहन
‘स्वच्छ अमरावती-सुंदर अमरावती’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आणि शहर कंटेनरमुक्त, प्लास्टिकमुक्त करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन महापौर संजय नरवणे यांनी केले आहे. कचरामुक्तीसाठी अमरावतीकरांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, ओला व सुका कचरा ठेवण्यासाठी दोन डस्टबिन ठेवाव्यात, तो कचरा महापालिकेच्या वाहनामध्येच टाकावा, नाल्याच्या काठावर किंवा उघड्यावर टाकू नका, असे आवाहन पदाधिकारी व महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार यांनी केले आहे.

Web Title: Plastic 'Mission' Plastic Removal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.