वॅगन दुरुस्ती कारखान्यात कामगारांच्या जीविताशी खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 05:00 AM2020-12-09T05:00:00+5:302020-12-09T05:00:37+5:30
श्यामकांत सहस्त्रभोजने लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : बहुप्रतीक्षित वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या उभारणी एक तर धिम्या गतीने होत आहे. ...
श्यामकांत सहस्त्रभोजने
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बहुप्रतीक्षित वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या उभारणी एक तर धिम्या गतीने होत आहे. त्यातच या कामावर असणाऱ्या कामगारांच्या जीविताशी खेळ होत असल्याचा प्रकार येथे सुरू आहे. यांत्रिकी काम होत असताना आवश्यक सुरक्षा साधनांचा अभाव असल्याने कंपनीच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
बडनेऱ्यात वॅगन दुरुस्ती कारखान्याची उभारणी दोन वर्षांपासून होत आहे. दोनशे कोटींहून अधिक किमतीचा हा प्रकल्प २०० एकरांत साकारत आहे. जिल्ह्यातील या सर्वांत मोठ्या प्रकल्पाचे काम कोलकात्याच्या प्रेमको कंपनीकडे देण्यात आले आहे. शंभराहून अधिक कामगार येथे जीव मुठीत घेऊन काम करीत आहेत. येथील कामगारांच्या सुरक्षेसंदर्भात कुठलीच काळजी कंपनीकडून घेतली जात नसल्याचे चित्र आहे. भव्य लोखंडी शेडखाली काम करताना वजनदार वस्तू कामगारांच्या अंगावर पडू शकते. अवजड लोखंडी साहित्याचा येथे वापर होतो. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कामगारांना सेफ्टी हेल्मेट, शूज यांसह त्यांच्या जीवितास धोका पोहोचू नये, अशा साधनांची आवश्यकता असते. तथापि, त्या कामगारांना पुरविण्यात आलेल्या नाही, असेच चित्र या ठिकाणी आहे. संबंधित कंपनी व कंत्राटदार कामगारांच्या जीविताशी खेळत आहे. संबंधित कंपनीला कामगारांच्या सुरक्षेबाबत प्रश्न का विचारला जाऊ नये, ही बाब शासनासह प्रशासनालाही गांभीर्याने घ्यावी लागणार आहे, अन्यथा याठिकाणी नाहक दुर्घटना घडू शकते.
कासव गतीने कामकाज
शहरातील बेरोजगारी मोठ्या प्रमाणात दूर करणारा प्रकल्प म्हणून वॅगन दुरुस्ती कारखान्याकडे पाहिले जात आहे. त्याच्या उभारणीसाठी कंपनीला ३६ महिन्यांचा अवधी दिला होता. दोन वर्षे उलटून गेली तरी आतापर्यंत अर्धेच काम झाले. आणखी दोन वर्षांचा कालावधी लागेल, असे बोलले जात आहे. सावकाश काम का होत आहे, हा प्रश्न अनुत्तरित आहे.