सखींनी घेतला कोजागिरी जागरणाचा आनंद
By admin | Published: November 1, 2015 12:20 AM2015-11-01T00:20:50+5:302015-11-01T00:20:50+5:30
लोकमत सखी मंच नेहमीच सखींसाठी शैक्षणिक, कलात्मक व विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेत असतो.
अमरावती : लोकमत सखी मंच नेहमीच सखींसाठी शैक्षणिक, कलात्मक व विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेत असतो. या उपक्रमाचीच एक शृंखला म्हणून सखींसाठी कोजागिरीचा कार्यक्रम गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात सखींनी कला, नृत्य, उखाणे तसेच भुलाबाईची गाणी सादर केलीत.
अल्पोहार व मसाले दुधाचा स्वाद घेत सखींनी एकापेक्षा एक सरस कला सादर केल्यात. सदर कार्यक्रमात सखींनी पहेली ग भुलाबाई, शिख्यावरचं लोणी कोणी खाल्लं गं, यासारख्या पारंपरिक भुलाबाईची गाणी म्हटलीत. काही सखींनी हास्य नाटिका सादर केल्यात. काहींनी एकापेक्षा एक सरस विनोदी उखाणे घेऊन हास्याचे फवारे उडविलीत. माधुरी आडे, सुनीता डोंगरेसह काही सखींनी आवडीच्या गाण्यावर नृत्यदेखील सादर केलेत. शेवटी सर्व सखींनी मिळून समूह नृत्याचा आनंद घेतला.
सदर कार्यक्रमास समाजसेविका अर्चना सवई यांनी भेट देऊन सखींना गौरविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना सपकाळ यांनी केले, तर कार्यक्रमासाठी नलिनी थोरात, माधुरी बोकरीया, रोहिणी कुंटे, विद्या सरोदे, संगीता अजमिरे, भारती क्षीरसागर, छाया औघड, हर्षा गोरटे, भारती दातेराव, करूणा कदम, मंदा कदम, सोनाली होले, अरूणा इंगोले, रत्ना पाटील यांनी प्रयत्न केला. आभार प्रदर्शन सखी मंचच्या स्वाती बडगुजर यांनी केले. (प्रतिनिधी)