जादा काम करण्याची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 06:00 AM2020-03-01T06:00:00+5:302020-03-01T06:00:53+5:30
जनतेचे सेवक या नात्याने एका सुटीच्या मोबदल्यात सर्वांनी अधिक कामाची हमी दिली. ही हमी अधिकाधिक उत्कृष्ट कामाची, पारदर्शकतेची, सकारात्मकतेची आणि आपल्या कार्य संस्कृतीला वेगळी झळाळी देण्याची असली पाहिजे. समाजातील उपेक्षित घटकांच्या जीवनात चैतन्य आणण्यासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सरकारी कर्मचाऱ्यांची पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी महाविकास आघाडी सरकारने मंजूर केली. शनिवारी या निर्णयाच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात शुक्रवारी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या शाखेतर्फे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जादा काम करण्याची शपथ घेतली.
यावेळी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष दत्तात्रय फिस्के, डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाळे, प्रशांत थोरात, डीपीओ वर्षा भाकरे, धात्रक, अढाऊ, कार्यकारी अभियंता प्रशांत गावंडे, प्रमोद तलवारे, कंवलजित चव्हाण, प्रवीण इंगळे, दीपक भिलपवार, प्रेम राठोड, अरुण बोंदरे, प्रवीण मोंढे, झेडपी कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष पकंज गुल्हाने यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी सर्वांनी जबाबदारीने, वेळेत जनतेची कामे केली पाहिजे, अशी अपेक्षा दत्तात्रय फिसके यांनी व्यक्त केली. पाच दिवसांचा आठवडा झाला असल्याने आठवड्यात एक सुटी वाढली असली तरी कामाची वेळही वाढली आहे.
जनतेचे सेवक या नात्याने एका सुटीच्या मोबदल्यात सर्वांनी अधिक कामाची हमी दिली. ही हमी अधिकाधिक उत्कृष्ट कामाची, पारदर्शकतेची, सकारात्मकतेची आणि आपल्या कार्य संस्कृतीला वेगळी झळाळी देण्याची असली पाहिजे.
समाजातील उपेक्षित घटकांच्या जीवनात चैतन्य आणण्यासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
असे आहे वचन
कार्यालयीन कामाच्या वेळेत जनतेची कामे अधिक वेगाने व सकारात्मक दृष्टीने सदैव करीत राहू. आमच्या रजा अथवा सुट्यांमुळे जनतेच्या कामात कोणतीही अडचण येणार नाही. आमची सर्व ऊर्जा सर्जनशीलता व उत्साह याद्वारे एकविसाव्या शतकातील वैभवशाली व नवमहाराष्ट्राच्या उभारणीसाठी आम्ही वचनबद्ध होत आहोत. वचनांचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी ‘जनतेचे सेवक’ या नात्याने आमच्या कार्यसंस्कृतीद्वारे आम्ही स्वीकारत असून, त्याची हमी महाराष्ट्राच्या जनतेला देत आहोत.