चांदूरबाजारच्या क्रीडा संकुलाची दुर्दशा
By admin | Published: November 30, 2015 12:34 AM2015-11-30T00:34:38+5:302015-11-30T00:34:38+5:30
ग्रामीण भागातील युवकांना खेळण्यासाठी सुसज्ज मैदान व इतर सोई मिळाव्या यासाठी शासनाने तालुकास्तरावर लाखो रूपये खर्चून क्रीडा संकुले निर्माण केली आहे.
चोरट्यांना मोकळे रान : लोखंडी गेट चोरण्याचा प्रयत्न
चांदूरबाजार : ग्रामीण भागातील युवकांना खेळण्यासाठी सुसज्ज मैदान व इतर सोई मिळाव्या यासाठी शासनाने तालुकास्तरावर लाखो रूपये खर्चून क्रीडा संकुले निर्माण केली आहे. परंतु क्रीडा अधिकाऱ्यांचा दुर्लक्षतेमुळे येथील क्रीडा संकुलाची दुर्दशा झालेली आहे.
मोर्शी मार्गावर उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलाची इमारत तयार होऊन ११ वर्षे झालेली आहे. या क्रीडा संकुलात लाकडी बॅडमिंटन कोर्ट, व्यायामशाळा, खेळाडुंना खेळण्याकरिता खुले मैदान, धावपट्टी उभारण्यात आली आहे. मात्र व्यायामशाळेचे साहित्य हे एका बंद खोलीतच पडून आहे तर नवीनच बनविण्यात आलेल्या बॅडमिंटन कोर्टवर पॉलीशची नितांत आवश्यकता आहे. परंतु या भव्य अशा क्रीडा संकुलाला देखरेखीकरिता कोणाचीही नियुक्ती नाही तर या लाखो रूपयांची संपत्तीचा कोणीही चौकीदार सुद्धा नाही. त्यामुळेच या इमारतीत नेहमीच आंबटशौकिनाचे वास्वव्य असते. या क्रीडा संकुलामध्ये दररोज शेकडो खेळाडू सकाळी ५ वाजतापासूनच मैदानावर खेळण्याकरिता जातात. त्यामुळे या मैदानावर सर्वदूर अंधारच असतो तर बॅडमिंटन मैदानावर मोठ्या प्रमाणावर कचरा पडलेला असल्याने खेळाडुंना आल्याबरोबर हॉलची साफसफाईच करावी लागते.
या क्रीडा संकुलाची अतिशय दयनीय अवस्था असून येथे पिण्याकरिता पाण्याची व्यवस्था नसून शौचालयात सर्वत्र घाणीचे वातावरण आहे. येथील वॉश बेसीनसुद्धा गायब असून बोरींगची व्यवस्थाही फक्त नावापुरतीच करण्यात आली आहे. येथील बोरींगला विद्युत जोडणी सुद्धा करण्यात आली नाही. तसेच मागील दरवाजा सुद्धा तोडण्यात आला असून पायऱ्यांची टाईल्स सुद्धा तुटली आहे.
आमदारांची वेळोवेळी मदत
आ. बच्चू कडू यांनी या क्रीडा संकुलाला सुरक्षा भिंत बांधण्याकरिता लाखोचा निधी उपलब्ध करून दिला. तसेच वेळोवेळी या क्रीडा संकुलाला लाकडी बॅडमिंटन कोर्ट, टिन शेड, स्वच्छतेसाठी निधीची मदत केली. मात्र काही कामचुकार अधिकारीमुळेच या क्रीडा संकुलाची दुर्दशा होत आहे. याकरिता आमदार बच्चू कडूंनी कठोर पवित्रा घ्यावा, अशी मागणी नागरिकांतर्फे होत आहे. (तालुका प्रतिनिधी)