वलगाव बसस्थानकाची दुर्दशा
By admin | Published: December 5, 2015 12:26 AM2015-12-05T00:26:32+5:302015-12-05T00:26:32+5:30
चार वर्षांपूर्वी वलगाव येथील बसस्थानकाचे मोठ्या थाटात लोकार्पण झाले. परंतु ज्या सुविधा येथे द्यायला पाहिजे त्या कोणत्याच सुविधा बस स्थानकामध्ये न दिल्यामुळे ...
रस्ते नाही : बसही थांबत नाही, प्रवाशांची गैरसोय
टाकरखेडा संभू : चार वर्षांपूर्वी वलगाव येथील बसस्थानकाचे मोठ्या थाटात लोकार्पण झाले. परंतु ज्या सुविधा येथे द्यायला पाहिजे त्या कोणत्याच सुविधा बस स्थानकामध्ये न दिल्यामुळे प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बसस्थानकावरच मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे बसचालकदेखील आत बस आणण्याचे टाळतात. त्यामुळे रस्त्यावरूनच बस निघून जाते. परिणामी प्रवाशांना बसस्थानकाऐवजी भर रस्त्यावरच बसची वाट पाहत थांबावे लागते.
अमरावती ते परतवाडा मार्गावर आसलेल्या वलगाव हे अति महत्त्वाचे ठिकाण समजले जाते. वलगावशी दर्यापूर, अकोट, चांदूरबाजार व परतवाडा हे तीन मार्ग जोडले आहे. या तीनही महत्त्वाच्या मार्गावर जाताना वलगाव येथून प्रवास करावा लागतो. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव केंद्रस्थानी असलेल्या वलगाव येथे नव्याने बसस्थानक सुरू करण्यात आले. चार वर्षांपूर्वी बसस्थानक सुरू झाले. परंतु सुविधा देण्याचे आश्वासन दिले त्याची पूर्तता आजवरही झालेली नाही. नव्याने बांधलेल्या बसस्थानकामध्येही खड्डे पडत आहेत. बसस्थानक परिसरात अद्यापही डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे बहुतांश बस स्थानकावर न येता रस्त्यावरच थांतात. याचाच फायदा खासगी बसचालक देखील घेत आहे. काही बसेस आतमध्ये येत नसल्याने प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी बसमध्ये प्रवास करावा लागत आहे. अखेर या बसस्थानकाला चांगले दिवस कधी येणार, अशा भावना प्रवासी व्यक्त करीत आहेत. याबाबत गावातील सामाजिक कार्यकर्ते अनिरुध्द उगले यांनी निवेदन देऊन बसस्थानकावर सोई, सुविधा देण्याची मागणी केली आहे. परंतु अद्यापही याची दखल परिवहन विभाग प्रशासनाने घेतलेली नाही. (वार्ताहर)