गावाबाहेरच्या व्यक्तींना भूखंड!
By admin | Published: December 6, 2015 12:14 AM2015-12-06T00:14:13+5:302015-12-06T00:14:13+5:30
निम्नपेढी प्रकल्पाशी दुरान्वयानेही संबंध नसणाऱ्या ७ जणांना भूखंड वाटप झाल्याचा आरोप गोपगव्हाण ग्रामस्थांनी केला आहे.
गोपगव्हाण ग्रामस्थांचा आरोप : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अमरावती : निम्नपेढी प्रकल्पाशी दुरान्वयानेही संबंध नसणाऱ्या ७ जणांना भूखंड वाटप झाल्याचा आरोप गोपगव्हाण ग्रामस्थांनी केला आहे. २७ नोव्हेंबर हा झालेला भूखंड वाटपात प्रचंड प्रमाणात घोळ झाल्याचे या प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे.
भातकुली तालुक्यातील निंभा गावाजवळून वाहणाऱ्या पेढी नदीवर निम्नपेढी प्रकल्प होत आहे. अळणगाव, गोपगव्हान, कुंडखुर्द, कुंडसर्जापूर आणि हातुर्णा ही पाच गावे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात आहे. त्या अनुषंगाने २७ नोव्हेंबरला गोपगव्हाण येथील ९८ कुटुंबांना भूखंडवाटप करण्यात आले. गोपगव्हाणचे पुनर्वसननजीकच्या लोणटेक येथे प्रस्तावित आहे.
दरम्यान, गोपगव्हाण येथील बुडित क्षेत्रात येणाऱ्या कुटुंबांना भूखंडवाटप करताना पुनर्वसन विभागाने यात घोळ केल्याचा आरोप येथील विशाल शिनगारे, भूषण निमकर, अशोक मोवाड, राबवसाहेब विघे, पद्माकर विघे, संतोष पेढेकर, विशाल शिनगारे यांनी केला. राजू पेढेकर, शेख इस्त्राईल, राजू ताडाम पवार, सुनंद भोसले, ताडम रामभाऊ पवार, मालूसिंग झगडू भोसले आणि ईसा रमजान शेख या व्यक्ती गावच्या रहिवासी नसूनही त्यांना पुनर्वसित गावठाणात भूखंड वाटप करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सरकारी अधिकारी उत्तर देण्यास टाळाटाळ करीत आहे. भूखंड वाटपाच्या प्रक्रियेस स्थगिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
यासंदर्भात गावकऱ्यांची तक्रार प्राप्त झाली आहे. गावाचे रहिवासी नसलेल्यांना भूखंड वाटप झाले असल्यास त्याची खातरजमा करण्यात येईल व ते भूखंड काढून घेण्यात येतील.
- जयंत देशपांडे,
जिल्हा पुनर्वसन अधिकारी.
गावातील रहिवासी नसताना भूखंड वाटप करण्यात आले आहे. गावकऱ्यांनी आक्षेप घेवूनही अधिकारी टाळाटाळ करीत आहे.
- विशाल शिनगारे, पेढी प्रकल्पग्रस्त.