जरूडमध्ये चाकूच्या धाकावर लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 10:24 PM2019-03-08T22:24:54+5:302019-03-08T22:25:07+5:30
येथील एका दुकानासह तीन ठिकाणी ८ मार्च रोजी मध्यरात्री धाडसी दरोडा घालण्यात आला. सासू-सुनेच्या गळ्याला चाकू लावून ३० ग्रॅम दागिन्यांसह १५०० रुपये रोख आणि एका दुकानातून चार हजार रुपये लंपास करण्यात आले. वरूड पोलिसांकडे श्वान नसल्याने प्रथमदर्शनी पंचनाम्यास मर्यादा आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
जरूड : येथील एका दुकानासह तीन ठिकाणी ८ मार्च रोजी मध्यरात्री धाडसी दरोडा घालण्यात आला. सासू-सुनेच्या गळ्याला चाकू लावून ३० ग्रॅम दागिन्यांसह १५०० रुपये रोख आणि एका दुकानातून चार हजार रुपये लंपास करण्यात आले. वरूड पोलिसांकडे श्वान नसल्याने प्रथमदर्शनी पंचनाम्यास मर्यादा आल्या.
जरूड येथे गुरुवारी मध्यरात्रीनंतर तोंडाला कापड बांधलेले चार युवक धर्मेंद्र राईकवार यांच्या घरात शिरले. जयश्री धर्मेंद्र राईकवार (३२) आणि त्यांच्या सासू माया गुणवंत राईकवार (६०) या दोघीच घरात झोपलेल्या होत्या, तर धर्मेंद्र बाहेरगावी गेले होते. सासूृ-सुनेच्या गळ्याला चाकू लावून चोरांनी ऐवज लंपास केला. यानंतर चोरांनी साईमंदिराकडे मोर्चा वळविला. तेथील दानपेटी फोडली आणि नयनसिंह चव्हाण यांच्या किराणा दुकानातून चार हजार रुपये लंपास केले. दरोडा घालणारे युवक २२ ते २५ वर्षे वयोगटातील असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तीनही घटनांत ९० हजारांचा ऐवज पळविला. उपविभागीय पोलीस अधिकारी दिलदार तडवी, ठाणेदार दीपक वानखडे, एपीआय गट्टे, जरूड बीटचे सुनील आकोलकर, मनोज कळसकर, स्थानिक गुन्हे शाखेचे चौधरी यांच्यासह पोलिसांनी पंचनामा केला. अज्ञात चोरांविरुद्ध भादंविचे कलम ३९२, ४५८, ४५७, ३५० अन्वये गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.