'बिग सिनेमा'त पाण्यासाठी लूट

By admin | Published: February 11, 2017 12:01 AM2017-02-11T00:01:53+5:302017-02-11T00:01:53+5:30

जयस्तंभ चौकातील ‘बिग सिनेमा’ या चित्रपटगृहात मनोरंजनासाठी येणाऱ्या ग्राहकांना पाण्याच्या एका बाटलीसाठी तब्बल ५० रूपये मोजावे लागतात.

Plunder for water in 'Big Cinema' | 'बिग सिनेमा'त पाण्यासाठी लूट

'बिग सिनेमा'त पाण्यासाठी लूट

Next

५० रुपयांचीच बाटली उपलब्ध : ग्राहकांसाठी नाही अन्य पर्यायी व्यवस्था
अमरावती : जयस्तंभ चौकातील ‘बिग सिनेमा’ या चित्रपटगृहात मनोरंजनासाठी येणाऱ्या ग्राहकांना पाण्याच्या एका बाटलीसाठी तब्बल ५० रूपये मोजावे लागतात. येथे विशिष्ट कंपनीची ५० रूपयांचीच बाटली उपलब्ध आहे. पाण्याची इतर कोणतीही सोेय येथे नसल्याने ग्राहकांना ही बाटली खरेदी केल्याशिवाय पर्याय नाही. याबाबतची ओरड अनेक ग्राहकांनी केली असून ग्राहकांची ही लूट थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
पाणी हे जीवन आहे, नैसर्गिक स्त्रोतातून मिळणाऱ्या पाण्याची आता सर्रास विक्री होते. पाणीविक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावल्याने पाण्याचे दरसुद्धा वधारले आहेत. पाण्याचे निर्जंतुुकीकरण करून विविध प्रक्रिया केल्यानंतर या बाटलीबंद पाण्याची विक्री केली जाते. साधारणत: १० ते १५ रूपये प्रतीलीटर असे पाण्याचे दर आहेत. मात्र, काही ठिकाणी पाणी थंड करून दिले जात असून ‘कुलिंग चार्जेस’च्या नावाखाली ते चढ्यादराने विक्री केले जात आहे. शहरातील काही सिनेमागृहात पाण्याच्या बाटलींची आगाऊ दराने विक्री करून सर्रास ग्राहकांची लूट होत असल्याचे चित्र आहे. जयस्तंभ चौकाजवळील ‘बिग सिनेमा’ या चित्रपटगृहात एका विशिष्ट कंपनीची पाण्याची बाटली विक्री केली जाते. ही बाटली छापील दरानुसार ५० रूपयांप्रमाणे विकली जाते. मात्र, ग्राहकांना कमी दराची बाटली हवी असेल तर ती त्याठिकाणी उपलब्ध नसते.

व्यवस्थापन निरंकुश
अमरावती : पाण्याची इतर कोणतीच पर्यायी सोय नसल्याने ग्राहकांना ही बाटली खरेदी करण्याखेरीज गत्यंतर उरत नाही. सिनेमा गृहात आलेल्या ग्राहकांना ५० रुपये खर्च करून पाणी बॉटल विकत घ्यावी लागते. येथे विक्री केला जाणारा नाश्ता व पॉपकॉर्नचे दरही अधिक असून मनोरंजनाच्या हेतुने येथे येणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला यामुळे मोठा ताण बसतो. ही एकाप्रकारे ग्राहकांची लूट असून अनेक ग्राहकांनी याबाबत ‘लोकमत’कडे तक्रारी देखील केल्या आहेत. रेल्वे स्थानकावर १५ रुपये किमतीची पाण्याची बाटली ‘कुलिंग चार्जेस’लाऊन २० रुपयांना विकली जाते. मात्र, बिग सिनेमातील पाण्याचे दर ग्राहकांना अजिबात परवडण्यासारखे नसल्यामुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकारावर कुणाचाच अंकुश नसल्याने येथे सर्रास मक्तेदारी सुरू असल्याचे दिसते.

कंपनीने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे खाद्यपदार्थ व पाण्याच्या बाटलींची विक्री केली जाते. बाटलीवर ५० रुपये छापील दर असल्याने त्याच किमतीत ती विकली जाते. ग्राहकांसाठी पाण्याची पर्यायी व्यवस्था म्हणून ‘आरो’ची सोय आहे.
- राजेश पेलागडे, मॅनेजर,
बीग सिनेमा (कार्निव्हल)

सिनेमागृहात पाणी बॉटलच्या विक्रीवर बंधने हवीत. पाण्याची पर्यायी व्यवस्था असायला हवी. जर पाणी बॉटल, नाश्ता किंवा पॉपकॉर्नची चढ्या दराने विक्री होत असेल तर त्यासंदर्भात ग्राहकांनी तक्रार करावी.
- अजय गाडे, संघटनमंत्री,
अ.भा. ग्राहक पंचायत.

सिनेमागृहात पाणी बॉटल्सची चढ्या दराने विक्री होत असेल तर ग्राहकांनी तक्रार करावी. तक्रार आल्यानंतर कारवाई करता येऊ शकते.
- डी.के.वानखडे,
जिल्हा पुरवठा अधिकारी

Web Title: Plunder for water in 'Big Cinema'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.