अमरावतीत ‘पीएम मित्रा’ मेगा टेक्सटाइल पार्क, विदर्भाच्या विकासाला मिळणार 'बूस्ट'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 10:33 AM2023-03-18T10:33:39+5:302023-03-18T10:40:35+5:30
पंतप्रधान मोदींची घोषणा : मेगा टेक्सटाईल पार्कसाठी नांदगाव पेठच्या औद्याेगिक वसाहतीत जमिनीचे आरक्षण
अमरावती : महाराष्ट्रातील अमरावतीसह देशात सात ठिकाणी 'पीएम मित्रा' अंतर्गत (मेगो इंटिग्रेटेड टेक्सटाइल रिजन अॅण्ड अॅपेरल) मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाइल पार्क स्थापन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली. अमरावतीजवळ नांदगाव पेठ येथे हा पार्क उभारला जाणार असून त्यामुळे पश्चिम विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.
एक हजार एकरावर होणाऱ्या या टेक्सटाइल पार्कमुळे १० हजार कोटींची गुंतवणूक शक्य असून, जवळपास एक लाख रोजगार निर्माण होतील. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आणि उत्तर प्रदेशमध्ये 'पीएम मित्रा'अंतर्गत हे पार्क उभारण्यात येणार आहेत. पाच 'एफ'च्या (फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन) व्हिजननुसार या पार्कमुळे देशातील वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना मिळेल.
अमरावती नजीकच्या नांदगाव पेठ येथे पंचतारांकित एमआयडीसीचा परिसर २८०९.७८ हेक्टर एवढा परिसर आहे. उद्योगासाठी एकूण १०७ भूखंड आरक्षित ठेवण्यात आले आहे. रेमण्ड, व्हीएचबी हे महत्त्वाचे प्रकल्प सुरू आहेत. तर रतन इंडिया औष्णिक वीज प्रकल्प कार्यान्वित आहे.
काय असेल या पार्कमध्ये
- जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा
- कापड उद्योगासाठी एकात्मिक प्रक्रिया
- आधुनिक औद्योगिक पायाभूत सुविधा
- कमीत कमी एक हजार एकर जमिनीवर पार्कची स्थापना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरावतीत मेगा टेक्स्टाईल पार्क मंजूर केला. या माध्यमातून एक लाख लोकांना थेट रोजगार, दोन लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. पंतप्रधानांचे ‘फायबर टू कॉटन’ हे स्वप्न पूर्णत्वास जाणार आहे.
- डॉ. अनिल बोंडे, खासदार
अमरावती येथे टेक्स्टाईल पार्क निर्मितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गाेयल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार केला होता. मेगा टेक्स्टाईल पार्क मंजुरीमुळे एक लाख लोकांना रोजगाराची संधी मिळेल.
- नवनीत राणा, खासदार, अमरावती