पंतप्रधानांच्या हस्ते पी.एम.उषा प्रोजेक्ट लाँच, अमरावती विद्यापीठाला मिळाले २० कोटी
By गणेश वासनिक | Published: February 20, 2024 05:21 PM2024-02-20T17:21:34+5:302024-02-20T17:22:39+5:30
अनुदानातून विविध शैक्षणिक व संशोधनपर उपक्रम पूर्ण होतील, कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते.
गणेश वासनिक, अमरावती : देशभरातील ४०० विद्यापीठांपैकी ७८ विद्यापीठांना पी.एम. - उषा योजनेंतर्गत अनुदान मिळणार आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला २० कोटी रूपयांचे अनुदान केंद्र शासनाने या योजनेंतर्गत मंजूर केले आहे. त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते जम्मू काश्मीर राज्यामधून आभासी पद्धतीने करण्यात आले. विद्यापीठातील डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख अधिसभा सभागृहात आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख उपस्थित होते.
पंतप्रधान यांनी पी.एम. - उषा प्रोजेक्ट लाँच केल्यानंतर संबोधित करताना म्हणाले, देशभरातील शैक्षणिक संस्थांचे बळकटीकरण व्हावे, त्या माध्यमातून शिक्षण, संशोधन व कौशल्याच्या संधी विद्यार्थ्यांना मिळाव्यात तसेच त्यांच्या माध्यमातून देशाचा विकास व्हावा, या उद्देशाने ३ हजार कोटी रूपयांपेक्षा अधिक अनुदान विविध विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांना दिले आहेत.
कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते म्हणाले, विद्यापीठाच्या विकासासाठी हे अनुदान आवश्यक होते. विद्यापीठात अनेक योजना आहेत, त्या योजनांवर काम करण्याकरीता अनुदान गरजेचे होते. आता अनुदान मंजूर झाल्यामुळे आपल्याला अधिक चांगल्या योजना व उपक्रम राबविता येईल. त्यामुळे विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासामध्ये भर पडेल आणि त्याचा जास्तीतजास्त लाभ विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व विद्यार्थ्याना होईल.
याकरीता गठीत समिती तसेच अधिकारी व शिक्षकांनी उत्कृष्टरितीने सादरीकरण करुन हे अनुदान प्राप्त करण्याकरीता सहकार्य केल्याबद्दल त्यांचे सुद्धा त्यांनी कौतुक केले. भविष्यात आणखी चांगले उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. या पी.एम. - उषा योजनेंतर्गत पायाभूत सुविधा व बांधकाम १६ कोटी, रिनोव्हेशन अँन्ड अपग्रेडेशन १.९५ कोटी, वैज्ञानिक उपकरणांची खरेदी १.२ कोटी, सॉफ्ट कम्पोनन्ट ०.८५ कोटी, असा निधी प्राप्त होणार आहे. प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर यांनी यावेळी मार्च २०२६ पर्यंत ही योजना आहे. या योजनेत मिळालेल्या अनुदानातून जलद गतीने कामे केल्या जाईल आणि येणाऱ्या नॅकमध्ये विद्यापीठाचा ग्रेड वाढविण्याकरीता ते उपयुक्त राहील. संचालन व आभार उपकुलसचिव (विकास) डॉ. सुलभा पाटील यांनी मानले.