वाशिम मॉडेल कॉलेजचे पंतप्रधानांच्या हस्ते डिजिटल लाँचिंग होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 04:48 PM2019-01-03T16:48:05+5:302019-01-03T16:48:17+5:30

१५ जानेवारी रोजी सोहळा : अमरावती विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा

PM will digital launch of Washim Model College | वाशिम मॉडेल कॉलेजचे पंतप्रधानांच्या हस्ते डिजिटल लाँचिंग होणार

वाशिम मॉडेल कॉलेजचे पंतप्रधानांच्या हस्ते डिजिटल लाँचिंग होणार

Next

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत वाशिम येथील शासकीय मॉडेल कॉलेजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १५ जानेवारी रोजी डिजिटल लाँचिंग पद्धतीने उद्घाटन होणार आहे. त्यामुळे अमरावती विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे.


राज्यात उच्च शिक्षणात गुणवत्ता, सर्वदूर संधी, समानता यावी, यासाठी केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान २.० अंतर्गत वाशिम येथे नवीन शासकीय मॉडेल डिग्री महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता प्रदान केली आहे. त्याकरिता १२ कोटींचे अनुदान मंजूर केले आहे. रुसा अंतर्गत नंदूरबार व वाशीम येथे शासकीय मॉडेल डिग्री महाविद्यालय सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित होणार आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रातील वाशीम येथे केंद्र शासनाने महाविद्यालय मंजूर केल्यामुळे ती अमरावती विद्यापीठासाठी मोठी उपलब्धी ठरली आहे. वाशीम जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरणार आहे.


शासकीय मॉडेल डिग्री महाविद्यालय यशस्वीपणे स्थापन होण्यासाठी आवश्यक जमीन, नियोजित इमारत बांधकाम, साधनसामग्री, फर्निचर खरेदी, प्रस्तावित महाविद्यालयाची प्रशासनिक संरचना, शैक्षणिक अभ्यासक्रम, प्रवेशप्रक्रिया, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीपदांचा आकृतीबंध, भौतिक व आर्थिक बाबींची माहिती, इमारत व वसतिगृहाच्या बांधकामावरील खर्च, बांधकाम पूर्ण होण्याचा कालावधी आदी बाबींशी निगडित प्रस्ताव तयार केला जाणार आहे. त्यासाठी संचालक, उच्चशिक्षण पुणे यांचे अध्यक्षतेखाली, राज्य प्रकल्प संचालनालयाचे सहसंचालक किंवा उपसंचालक व अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव अजय देशमुख यांचा समावेश असलेली एम.डी.सी. वाशीम समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.
 

   
केंद्र शासनाने वाशीम येथील शासकीय मॉडेल कॉलेज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १५ जानेवारी रोजी डिजिटल लाँचिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने अमरावती विद्यापीठाने तयारी चालविली असून, या मॉडेल कॉलेजच्या माध्यमातून वाशीम भागातील उच्च शिक्षणाचा बॅकलॉग भरून निघणार आहे.
- मुरलीधर चांदेकर,
   कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

 

Web Title: PM will digital launch of Washim Model College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.