पीएनबी घोटाळा : अमरावतीचा व्यापारी अडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 11:40 PM2018-02-20T23:40:24+5:302018-02-20T23:41:06+5:30
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसी याने अमरावती येथील एका बड्या व्यावसायिकाची कोट्यवधीने फसवणूक केल्याची माहिती पुढे आली आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसी याने अमरावती येथील एका बड्या व्यावसायिकाची कोट्यवधीने फसवणूक केल्याची माहिती पुढे आली आहे. गीताजंली ज्वेलर्सची फ्रेन्चायसी घेऊन या व्यावसायिकाने राजकमल चौक स्थित लढ्ढा मॉलमध्ये प्रतिष्ठान थाटले. मात्र, वर्षभरातच प्रतिष्ठानाला टाळे लागले.
पीएनबी घोटाळ्यातील आरोपी निरव मोदी व मेहुल चोकसी यांच्याशी संबंधित मुंबई, पुणे औरंगाबाद, ठाणे कोलकाता, दिल्ली यांसह देशभरात ३८ ठिकाणी सोमवारी धाडी घालण्यात आल्या. सन २०१३ ते २०१७ या काळात चोकसी व मोदी यांनी देशभरातील विविध व्यावसायिकांना डायमंड ज्वेलरीच्या फ्रेन्चायसी दिल्या. यात अमरावतीच्या माहेश्वरी समाजातील एका बड्या व्यावसायिकाने फ्रेन्चायसी घेतली. गीताजंली ज्वेलर्स नावाने उघडलेल्या या प्रतिष्ठानातून त्यांनी हिºयांची विक्रीसुद्धा सुरू केली. मात्र, काही दिवसांनंतर कंपनीकडून पाठविण्यात आलेले हिरे बनावट असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. कंपनीशी सपर्क साधून त्यांनी आक्षेप नोंदविला व गुंतवविलेली रक्कम परत मागितली. सोबतच त्यांनी मोदी व चोकशी यांच्या कंपनीचे शेअर विकत घेतल्याने त्यांना मोठा फटका बसला. गुंतविलेली रक्कम परत मिळविण्यासाठी तो व्यावसायिक मागील अनेक दिवसांपासून मुंबईच्या फेऱ्या घालत आहे. पीएनबी घोटाळा उघड झाल्यानंतर ते प्रचंड अस्वस्थ झाल्याची प्रतिक्रिया सराफा बाजारात आहे.
गीतांजलीच्या ‘त्या’ प्रतिष्ठानाला टाळे
माहितीनुसार सुमारे दीड वर्षांपूर्वी राजकमल चौक स्थित लढ्ढा मॉलमध्ये अमरावतीच्या व्यावसायिक वर्तुळात बडे नाव असलेल्या त्या व्यावसायिकाने गीतांजली ज्वेलर्स नावाने प्रतिष्ठान उघडले. त्यातून हिºयाच्या दागिन्यांची विक्री सुरू केली. मेहुल चोकसीच्या मालकीची हिरे निर्मिती कंपनीची आकर्षक जाहिरात पाहून त्यांनी फ्रेन्चायसी मिळविली होती. अमरावतीमध्ये पहिल्यादाच गीतांजली ब्रँडनेमने हिºयांच्या दागिन्यांची विक्री होत असल्याने अमरावतीकरांच्याही उड्या पडल्या. मात्र, अचानक सहा महिन्यांपूर्वी या प्रतिष्ठानाला टाळे लागल्याची माहिती शेजारी असलेल्या व्यावसायिकांनी दिली.
सीव्हीसीचे दल अमरावतीत येणार
केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) या घोटाळ्याची चौकशी सुरू केली आहे. हा घोटाळा नेमका झाला कसा, यासाठी विविध ठिकाणी धाडी घालण्याचे सत्र सुरू केले आहे. मेहुल चोकसीने ज्या-ज्या शहरांमध्ये गीतांजली ज्वेलर्सचे फ्रेन्चायसी दिली, त्या-त्या शहरांमधून फसवणूक झालेल्या व्यावसायिकांची माहिती घेतली जात आहे. अमरावतीच्या या स्थानिक व्यावसायिकाचीही याबाबत ईडीकडून चौकशी होणार असल्याचे संकेत आहेत. पीएनबी घोटाळ्यात स्थानिक व्यावसायिक कोट्यवधीने फसल्याच्या माहितीला काही सराफा व्यावसायिकांनी दुजोरा दिला आहे.