न्यूमिकोकल लस रोखणार बालमृत्यू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:10 AM2021-07-10T04:10:32+5:302021-07-10T04:10:32+5:30
अमरावती : एका वर्षाआतील बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी आता बालकांना न्यूमोकोकल लस येत्या सोमवारपासून दिली जाणार आहे. यासाठी महापालिकेसह जिल्हा ...
अमरावती : एका वर्षाआतील बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी आता बालकांना न्यूमोकोकल लस येत्या सोमवारपासून दिली जाणार आहे.
यासाठी महापालिकेसह जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना मंगळवारी प्रशिक्षण देण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. ठोसर यांनी हे प्रशिक्षण दिले.
बालकांचा न्युमोनियापासून बचाव व्हावा, याकरिता दीड महिन्याच्या आतील बालकांना या लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. साडेतीन महिन्यानंतर दुसरा व नऊ महिन्यानंतर तिसरा डोस दिल्या जाईल. जिल्ह्यात या लसीकरिता ४१,७६९ बालके लाभार्थी आहेत. न्यूमोकोकस बॅक्टेरियाचा संसर्ग झाल्यामुळे मेनिजायंटीस, सेप्टीसिमीया आणि न्यूमोनियासारखे गंभीर आजार होऊ शकतात. याशिवाय सानुसायटीससारखे सौम्य आजारदेखील होऊ शकतात. यासाठी पीसीव्ही लसीकरण करून आपण मुलांमधील न्यूमोकोकल आजार व त्यामुळे होणारे बालमृत्यू टाळू शकतो.
न्यूमिकोकल आजार हा संसर्गजन्य असून तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला खोकला किंवा शिंकताना संपर्कात आल्यामुळे पसरतो. साधारणपणे या आजारात १५ टक्के बालकांचा मृत्यू होतो. अधिकतर स्वस्थ व्यक्ती आपल्या नैसर्गिक रोगप्रतिकारशक्तीमुळे या आजाराच्या संसर्गाशी लढा देतात. लहान मुले किंवा वयस्कर व्यक्तींना या न्यूमोकोकल आजाराचा धोका जास्त असतो. कुपोषण, स्तनपानाचा अभाव, घरातील धुराचा संपर्क आणि घरामध्ये लोकांची दाटी यामुळे अर्भके व आणि बालके यांना अतिरिक्त धोका असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
बॉक्स
या आजाराची लक्षणे त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. आणि शरीरातील ऑक्सिजन कमी होऊ शकते ही या आजाराची लक्षणे आहेत. खोकला, धाप लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे आदी लक्षणे दिसू शकतात. आजार गंभीर असल्यास मुलांना खानपाणात अडचणी येऊ शकते. फिट येऊ शकते, बेशुद्ध होऊ शकतात व मृत्यूदेखील ओढावू शकतो.
बॉक्स
काय आहे न्यूमोकोकल न्यूमोनिया?
न्यूमोकोकल न्यूमोनिया हा श्वसन मार्गात होणारा एक संसर्ग आहे. ज्यामुळे फुफ्फुसावर सूज येऊन त्यात पाणी भरू शकते. स्टेप्टोकोकस न्यूमोनिया हा न्यूमोकोकस बॅक्टेरिया हा शरीरातील विविध भागात पसरून वेगळे आजार उत्पन्न करू शकतो व हा बॅक्टेरिया पाच वर्षाआतील मुलांना होणाऱ्या न्युमोनियाचे प्रमुख कारण आहे.
बॉक्स
लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
बालकांच्या आजारावरील लसीकरणाचे प्रशिक्षण बुधवारी महापालिकेतील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात व जिल्हा ग्रामीणमधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण पार पडले. जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ ठोसर यांनी या आजाराविषयी माहिती देऊन लसीकरणाविषयी माहिती दिली. लसीकरण १२ ला सुरू होत असले तरी याचे टप्पे निश्चित करण्यात आलेले नाहीत.
बॉक्स
लसीकरणासाठी पात्र बालके
अचलपूर : २,६४० धामणगाव : १,७०७
अमरावती (ग्रा) : २,०४२ धारणी : ४,६२२
अंजनगाव :१,६३८ मोर्शी :२,१८८
भातकुली :१,५९९ नांदगाव खं :१,९२९
चांदूर बाजार २,६१५ तिवसा :१,७१९
चांदूर रेल्वे १,०६३ वरुड : २,३८८
चिखलदरा : २,६१२ महापालिका क्षेत्र :११,०३१
दर्यापूर :१,९७६ एकूण ४१,७६९