शकुंतलेच्या उद्धाराकरिता कविसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 09:59 PM2018-12-02T21:59:29+5:302018-12-02T21:59:50+5:30

अचलपूर ते मूर्तिजापूर लोहमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून शकुंतलेचा उद्धार व्हावा, ती अधिक सक्षमपणे व्हावी, यांसह तिच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याकरिता साहित्यिकांनी चक्क शकुंतलेतच कविसंमेलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Poetry for the salvation of Shakuntala | शकुंतलेच्या उद्धाराकरिता कविसंमेलन

शकुंतलेच्या उद्धाराकरिता कविसंमेलन

Next
ठळक मुद्देशब्दांचा जागर : सरकारचे लक्ष वेधण्याकरिता साहित्यिकांचा उपक्रम, खासदारही करणार प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर ते मूर्तिजापूर लोहमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून शकुंतलेचा उद्धार व्हावा, ती अधिक सक्षमपणे व्हावी, यांसह तिच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याकरिता साहित्यिकांनी चक्क शकुंतलेतच कविसंमेलन करण्याचा निर्णय घेतला आहे. १६ डिसेंबर रोजी अचलपूर-दर्यापूर प्रवासादरम्यान धावत्या शकुंतलेत साहित्यिक वऱ्हाडी कवी शब्दांचा जागर मांडणार आहेत. यात खा. आनंदराव अडसूळ यांच्यासह अनेक गणमान्य तिकीट काढून हा रेल्वे प्रवास करणार आहेत.
दिवंगत खा. सुदाम देशमुख यांच्यानंतर आनंदराव अडसूळ हे शकुंतलेतून प्रवास करणारे दुसरे खासदार ठरतील. या कविसंमेलनाच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर शकुंतला हाउसफुल्ल धावणार आहे. तिचे चारही डबे खचाखच भरतील. प्रतिभा साहित्य संघाच्या विद्यमाने हा अभिनव उपक्रम होत आहे.
प्रतिभा साहित्य संघाचे अध्यक्ष विठ्ठल कुलट व जितेंद्र रोडे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. या कविसंमेलनात सतीश तराळ, अनिल पाटील, विजय सोसे, गजानन मते, राजा धर्माधिकारी, नितीन देशमुख, मंगेश वानखडे, गौतम गुडधे, राजीव शिंदे, ओमप्रकाश ढोरे, चंद्रकांत तारे, प्रवीण कावरे, प्रशांत कोल्हे, गौतम खोब्रागडे या कवींसह काशीनाथ बराटे, प्रमोद गारोडे, एकनाथ तट्टे, रूपेश ढेपे, प्रवीण पाटील, सुनील भालेराव व नागरिक तसेच मित्रमंडळीचा सहभाग राहणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे
अचलपुरातून प्रारंभ
अचलपूर रेल्वे स्थानकावर सकाळी १० पासून कवी, साहित्यिक, गणमान्य नागरिक व नेते शकुंतलेकरिता उपस्थित राहतील. शकुंतला येण्यापूर्वीच शब्दांचा जागर सुरू होईल. खा. अडसूळ, नगराध्यक्ष सुनीता फिसके, पं.स.सभापती देवेंद्र पेटकर, अचलपूर बाजार समितीचे सभापती अजय टवलारकर, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, सुरेखा ठाकरे, केवलराम काळे, नयना बच्चू कडू, सुरेश ठाकरे, गजानन कोल्हे आदी उपस्थित राहतील.
अंजनगावात स्वागत
अचलपूरहून निघालेल्या मंडळींचे दुपारी अडीच वाजता अंजनगाव रेल्वे स्थानकावर आमदार रमेश बुंदिले व नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे स्वागत करतील. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रेमकुमार बोके, माजी सभापती शशिकांत मंगळे, प्रवीण पेटकर, बंडू येवले, कपिल देशमुख यांची उपस्थिती राहील.
समारोप दर्यापुरात
कविसंमेलनाचा समारोप दर्यापूर रेल्वे स्थानकावर सायंकाळी ४ वाजता होईल. याप्रसंगी नगराध्यक्ष नलिनी भारसाकळे, जि.प. आरोग्य सभापती बळवंत वानखडे, सदस्य बाळासाहेब हिंगणीकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुधाकर भारसाकळे, शेतकरी नेते विजय विल्हेकर, शिवसेनेचे विकास येवले, गोपाल अरबट, रवींद्र गणोरकर उपस्थित राहतील.
सर्व काही शकुंतलेसाठी
पाच ते दहा किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या शकुंतला रेल्वे मार्ग यवतमाळ, अकोला व अमरावती असे तीन जिल्हे जोडतो. मात्र, सुदामकाका देशमुख यांचा एकमेव अपवाद वगळता, या रेल्वे मार्गाच्या आधुनिकीकरणासाठी जोरकस आवाज लोकप्रतिनिधींनी उठवला नाही. त्यामुळे शासनानेही काही कार्यवाही केली नाही. हा मुद्दा प्रकर्षाने पुढे यावा, यासाठी हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

Web Title: Poetry for the salvation of Shakuntala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.