पोहरा-चिरोडी जंगलाची इको टुरिझमकडे वाटचाल
By admin | Published: February 12, 2017 12:03 AM2017-02-12T00:03:48+5:302017-02-12T00:03:48+5:30
पोहरा, चिरोडी, मालखेड जंगलातील पर्यावरणपूरक वातावरण व वन्यप्राण्यांची संख्या लक्षात घेता ...
प्रस्ताव प्रक्रियेला सुरुवात : वनाधिकाऱ्यांकडून पाहणी
वैभव बाबरेकर अमरावती
पोहरा, चिरोडी, मालखेड जंगलातील पर्यावरणपूरक वातावरण व वन्यप्राण्यांची संख्या लक्षात घेता या ठिकाणी इको टुरिझम विकसित करण्याची संकल्पना अमरावती वनविभागाने मांडली आहे. यासंबंधी शुक्रवारी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जंगलातील आकर्षित स्थळांची पाहणी करून नियोजन सुरू केले आहे. तसा प्रस्तावही तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
देशभरातील विविध राज्यांमधील काही ठिकाणी जंगलाचा भाग असून काही ठिकाणचे जंगल इको टुरिझमच्या माध्यमातून विकसित करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी पर्यटकांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जंगल म्हटले की पर्यावरणपूरक वातावरण व वन्यप्राण्यांच्या अधिवासाचे ठिकाण लक्ष्यात येते. शहरातील नागरिकांना जंगल व वन्यप्राण्यांविषयी एक विशेष आकर्षण आहे. जंगल भ्रमंती करून वन्यप्राण्याचा मुक्त संचार पाहण्याचा छंदसुद्धा अनेकांनी बाळगला आहे. जंगलाला पर्यटन स्थळ म्हणूनदेखील आज ओळखले जात आहे. देश-विदेशातील अनेक जण इको टुरिझमच्या माध्यमातून जंगल सफारीचा आनंद घेतात. जंगलातील नैसर्गिक वातावरणात राहणे व जंगल भ्रमंती करून वन्यप्राण्यांना पाहणे, ही बाब पर्यटकांना आकर्षित करणारेच ठरते. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटचे जंगल हे पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरले आहे. त्यादृष्टीने अमरावती शहरालगत असणाऱ्या जंगलाला पाहण्यासाठी पर्यटक आकर्षित होऊ शकतात.
पोहरा, चिरोडी व मालखेड या जंगलातसुद्धा विविध वन्यप्राणी व जैवविविधता आहे. वाघ, बिबट, हरिण, मोर आदीे अनेक वन्यजीव नागरिकांच्या अनेकदा दृष्टीस पडत आहेत. त्याअनुषंगाने या जंगलात इको टुरिझमच्या माध्यमातून जंगल भ्रमंती, हे विशेष आकर्षण ठरू शकते. त्यादृष्टीने आता अमरावती वनविभागाने पाऊल उचलले आहे.
व्याघ्र दर्शनाची उत्सुकता वाढणार
वाघ पाहण्यासाठी देश-विदेशीतून अनेक पर्यटक भारतभरातील विविध जंगलात भ्रमंतीला येतात. पेंच-ताडोबाच्या जंगलात अनेकांना सहजरीत्या वाघाचे दर्शन घडते. पोहरा-चिरोडी जंगलात पट्टेदार वाघाचे वास्तव्य आहे. वनविभागाने त्याची पुष्टीसुद्धा केली आहे. त्यातच इको टुरिझमच्या माध्यमातून पर्यटनाची सुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटकांची गर्दी वाढणार आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे व्याघ्र दर्शनच राहणार आहे.
स्थानिकांना मिळणार रोजगाराची संधी
शहरालगतच्या जंगलात इको टुरिझमच्या माध्यमातून पर्यटन सुविधा उपलब्ध झाल्यास स्थानिक तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. पर्यटकांची गर्दी वाढल्यास गावखेड्यांतील नागरिकांचे व्यवसायसुद्धा फुलणार आहेत. त्या दृष्टीनेही वनविभाग विचारधीन आहे.
इको टुरिझमच्या माध्यमातून जंगल भ्रमंती व नेचर वॉक करण्यास पोहरा-चिरोडी जंगल चांगले आहे. हा प्रस्ताव विचाराधिन असून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे
- हेमंतकुमार मीणा,
उपवनसंरक्षक, अमरावती वनविभाग