पोलीस आयुक्तालयात इसमाने घेतले विष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2022 05:00 AM2022-05-08T05:00:00+5:302022-05-08T05:00:56+5:30
पोलीस मुख्यालयातील शिपाई विवेक मधुकर सकसुळे (३६) यांनी या घटनेची तक्रार फ्रेजरपुरा ठाण्यात नोंदविली. विवेक सकसुळे हे शनिवारी अभ्यागत कक्षात महिला शिपाई हर्षाली देवळे यांच्यासमवेत कर्तव्यावर होते. सकाळी ११.२० वाजताच्या सुमारास प्रवीण राजुरकर हा पोलीस आयुक्तालयात पोहोचला. खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार दिली. परंतु, कारवाई झाली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहर पोलीस आयुक्तालयात शनिवारी दुपारी ११.२० वाजता एका व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. प्रवीण किसनराव राजुरकर (४५, रा. पार्वतीनगर क्रमांक २) असे विष प्राशन केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी तातडीने प्रवीणला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेल्याने त्याचे प्राण वाचले. याप्रकरणात फ्रेजरपुरा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कलम ३०९ अन्वये गुन्हा नोंदविला.
पोलीस मुख्यालयातील शिपाई विवेक मधुकर सकसुळे (३६) यांनी या घटनेची तक्रार फ्रेजरपुरा ठाण्यात नोंदविली. विवेक सकसुळे हे शनिवारी अभ्यागत कक्षात महिला शिपाई हर्षाली देवळे यांच्यासमवेत कर्तव्यावर होते. सकाळी ११.२० वाजताच्या सुमारास प्रवीण राजुरकर हा पोलीस आयुक्तालयात पोहोचला. खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार दिली. परंतु, कारवाई झाली नाही. त्यामुळे पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी असल्याचे त्याने सकसुळे यांना सांगितले. त्याची अभ्यागत कक्षातील रजिस्टरमध्ये हर्षाली यांनी नोंद घेतली. दरम्यान विवेक राजुरकर हा थोडा बाजूला गेला आणि त्याने खिशातून निळ्या रंगाची प्लॉस्टिकची बॉटल काढली आणि त्या बॉटलमधील विषारी द्रव्य पिण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून सकसुळे यांनी समयसूचकतेने तत्काळ तेथील स्वच्छता कर्मचारी नरेंद्र पासवे यांना आवाज देऊन राजुरकरच्या हातातील प्लास्टिकची बॉटल घेण्यास सांगितले.
दरम्यान, नरेंद्र पासवे यांनी राजुरकरच्या हातातील बॉटल हिसकावून घेतली. परंतु, तोपर्यंत राजुरकरने थोडेफार विषारी द्रव्य प्राशन केले होते. त्याच्या अंगावरसुद्धा ते द्रव्य सांडले होते. त्यानंतर तेथे तैनात असणारे पोलीस कर्मचारी मनोज साखरकर, प्रवीण बुंदेले, प्रशांत खांदे यांच्या मदतीने राजुरकरला ताब्यात घेण्यात आले. यावेळी अभ्यागत कक्षात अनिता कुरवाने व रामरती नानक कोठारे (दोन्ही रा. चिंचफैल) या उपस्थित होत्या. या घटनेची माहिती बिनतारी संदेशद्वारे फ्रेजरपुरा पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक दत्ता नरवाडे हे पथकासह पोलीस आयुक्तालयात पोहोचले. त्यांनी तत्काळ प्रवीण राजुरकरला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता नेले.