विष घेतलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:23 AM2020-12-03T04:23:03+5:302020-12-03T04:23:03+5:30

पानफोटो - मोर्शी ०२ एस पिंपळखुटा मोठा येथील घटना, दीड लाखांचे कर्ज, तीन एकरात उत्पादन शून्य मोर्शी : नापिकीमुळे ...

Poisoned farmer dies during treatment | विष घेतलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

विष घेतलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

Next

पानफोटो - मोर्शी ०२ एस

पिंपळखुटा मोठा येथील घटना, दीड लाखांचे कर्ज, तीन एकरात उत्पादन शून्य

मोर्शी : नापिकीमुळे विष घेतलेल्या पिंपळखुटा मोठा येथील शेतकऱ्याचा मृत्यू जिल्हा सामान्य रुग्णालयात बुधवारी उपचारादरम्यान झाला. आत्महत्यांचे सत्र थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यानिमित्ताने शेतकरी वर्गातून होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, गजानन किसन उघडे (४७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पिंपळखुटा शिवारात त्यांची तीन एकर शेती आहे. त्यांनी यंदा पेरणीसाठी सेंट्रल बँकेकडून एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. याशिवाय महिंद्रा फायनान्स कंपनीचे दीड लाख व व काही खाजगी कर्ज घेऊन तीन एकरात सोयाबीन, उडीद, मूग व कपाशीची पेरणी केली. उडीद, मूग पाण्याने गेल्याने व सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याने ते उगवलेच नाही. शेती रिकामी राहू नये म्हणून त्यांनी कपाशीची पेरणी केली. महागडे खत, कीटकनाशक व मजुरांवर मोठी रक्कम खर्च झाली. कपाशीची वाढ झाली, परंतु झाडाला पात्या, फुले व बोंडे नव्हते. त्यानंतर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आणि सततच्या पावसामुळे बोंडात पाणी गेल्याने कापूस खराब झाला. कापूस वेचायला क्विंटलमागे पंधराशे ते दोन हजार खर्च झाला. आता नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे तुरीचा बहर गळून पडला. हाती आलेला कापूस कमी भावाने शेतकऱ्यांना विकावा लागला. त्यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडायचे व आपल्या पत्नीसह दोन मुलांचे पालन-पोषण कसे करायचे, या विवंचनेत गजानन उघडे यांचा प्रत्येक दिवस जात होता. या अवस्थेत २५ नोव्हेंबर रोजी त्यांनी विषारी औषध प्राशन केले. परिणामी त्यांना उलट्या होत होत्या. त्या नेहमीच्याच असल्याचे कुटुंबीयांचे त्याकडे लक्ष गेले नाही. यादरम्यान त्यांनी जेवणदेखील केले. अखेर त्रास असह्य झाल्यानंतर त्यांनी विष घेतल्याचे सांगितले. यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना प्रथम मोर्शीचे उपजिल्हा रुग्णालय व त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.

झुंज संपली

जिल्हा सामान्य रुग्णालयात खुद्द जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी गजानन उघडे यांच्यावर उपचार केला. अखेर ५५ तास मृत्यूशी झुंज देणाऱ्या गजानन उघडे यांची प्राणज्योत मालवली. २९ नोव्हेंबर रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला.

मुलांचा आधार हिरावला

गजानन उघडे यांच्या मृत्यूने कुटुंबाचा आधार हिरावला आहे. ते गावाचे माजी उपसरपंच होते, तर त्यांचे बंधू विठ्ठलराव उघडे हे बाजार समितीचे माजी संचालक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दहावीतील मुलगा पवन व आठवीत शिकणारी मुलगी ऋतुजा असे सदस्य आहेत.

शासनाकडून मदत मिळणार केव्हा?

निसर्गाच्या अवकृपेमुळे व नकली बियाण्यांमुळे यावर्षी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकही पीक घरी आलेले नसल्याने शेतकरी पूर्णतः खचून गेला असल्यामुळे त्यांच्यावर आत्महत्येची वेळ येऊन ठेपली आहे. या गंभीर समस्येची दखल घेऊन शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची घोषणा करावी, अन्यथा आत्महत्यांचे सत्र सुरू होईल, अशी भीती या घटनेच्या अनुषंगाने व्यक्त होत आहे.

Web Title: Poisoned farmer dies during treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.