विष घेतलेल्या तरुणाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू, डॉक्टरवर हलगर्जीपानाचा आरोप, नातेवाईक संतप्त
By प्रदीप भाकरे | Published: June 23, 2024 11:38 PM2024-06-23T23:38:29+5:302024-06-23T23:39:42+5:30
रुग्णालयाला पोलीस छावणीचे स्वरूप
प्रदीप भाकरे, अमरावती : येथील राजापेठस्थित एका खाजगी रुग्णालयात रविवारी रात्री आठच्या सुमारास एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी 12 वाजतापासून रात्री आठ वाजेपर्यंत दवाखान्यातील वीज पुरवठा खंडित असल्याने त्याच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे तो दगवाल्याचा आरोप करून नातेवाईकांनी आक्रोश केला. परिणामी राजापेठ पोलिसांना धाव घ्यावी लागली. रात्री 11 पर्यंत तो तणाव निवळलेला नव्हता.
तुषार रमेशसिंह चव्हाण (वय 23 वर्ष, रा. बेलपुरा) असे मृताचे नाव आहे. परवा त्याने विषारी द्रव्य घेतल्याने त्याला नजीकच्याच खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र रविवार सकाळपासून विद्युत पुरवठा खंडित झाला.जेनरेटरच्या दुरुस्तीमध्ये अनेक तास वाया गेले. अशात तो रात्रीच्या वेळी दगावला. या प्रकरणात मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात चांगलाच रोष व्यक्त केला. आमदार रवी राणा यांचे बंधू सुनील राणा व माजी नगरसेविका राधा कुरील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणीही ऐकायला तयार नसल्याने राजापेठ पोलिसांना पाचारण करावे लागले.
संबंधित डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल होईपर्यंत आपण मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा घेतल्याने रुग्णालयातील तणाव वृत्त लिहिसतोवर निवळलेला नव्हता. बेलपुरा येथील तरुणाई व नातेवाईकांनी मोठा रोष व्यक्त करत तेथे गर्दी केली आहे. राजापेठचे ठाणेदार महेंद्र अंभोरे हे रुग्णालयात दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे त्याने आत्महत्या का केली, ते कारण शोधून संबंधितंवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. रुग्णालयाबाहेर अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.