11 शेतमजुरांना पिण्याच्या पाण्यातून विषबाधा, रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 07:16 PM2019-11-25T19:16:01+5:302019-11-25T19:16:23+5:30
आठ गंभीर : उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
परतवाडा : सावळी दातुरा परिसरातील एका शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या अचलपूर येथील ११ शेतमजुरांना पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाली. सोमवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही घटना उघड झाली. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आठ गंभीर रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारार्थ हलवण्यात आले आहे.
उषा तायडे (३५), सुवर्णा रामेश्वर तायडे (३२), लता वानखडे (४५), संगीता वानखडे (४२), बाबाराव तायडे (४५), रामेश्वर गुणाजी तायडे, नम्रता हरसुले (३८, सर्व रा. बुंदेलपुरा, अचलपूर) अशी विषबाधा झालेल्या मजुरांची नावे आहेत. हे शेतमजूर नजीकच्या सावळी दातुरा येथील एका शेतात नेहमीप्रमाणे कापूस वेचणीसाठी गेले होते. दुपारी दीडच्या सुमारास तेथील एका माठात असलेले पाणी प्यायल्याने त्यांना मळमळ होऊ लागली. त्यामुळे त्यांना अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झालेल्या आठ रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधिकारी सोनिया तिवारी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सामाजिक कार्यकर्ते दीपक पंडोले व सहकाºयांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविले.