चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने विषबाधा
By admin | Published: August 30, 2015 12:03 AM2015-08-30T00:03:17+5:302015-08-30T00:03:17+5:30
चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने सहा चिमुकल्यांना विषबाधा झाल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली.
पिंपरी थूगावातील घटना : इर्विनमध्ये सहा चिमुकले दाखल
अमरावती : चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने सहा चिमुकल्यांना विषबाधा झाल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. रोशन गुलाब वाघमारे (५), करिना रामदास वाघमारे (६), ज्योती विनोद भिवर (३), भैय्या विनोद भिवर (२), रश्मी राजू वाघमारे (४) व राजेंद्र राजू वाघमारे (२, रा. सर्व राहणार पींपरी थूगाव) यांना इर्विन रुग्णालयात दाखल केले आहे.
पिंपरीतील या चिमुकल्याचे आई-वडील शेतात कामाकरिता गेले असता चिमुकले राधाकृष्ण मंदिराच्या आवारात खेळत होते. दरम्यान त्यांना मंदिर परिसरात चंद्रज्योतीच्या बिया आढळून आल्यात.
तिघांच्या प्रकृतीत सुधारणा
अमरावती : बीया खाल्ल्यावर काही वेळात उलट्याचा त्रास होऊ लागले. त्यांनी तत्काळ घर गाठून कुटुंबीयांना माहिती दिली.
दुपारच्या सुमारास आई-वडील शेतातून घरी आल्यावर त्यांनी चिमुकल्याना तत्काळ चांदूरबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखविले. मात्र, त्यांची प्रकृती गंभिर असल्याचे पाहून तेथील डॉक्टरांनी सहाही चिमुकल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले. इर्विनमध्ये बालरोग तज्ज्ञ नितीन राऊत यांनी चिमुकल्यांची तपासणी करून उपचार सुरु केले. सहापैकी तीन चिमुकल्याची प्रकृतीत सुधारणा झाली असून अद्यापही तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयीन सुत्रांनी दिली.