चमक येथे तेरवीच्या जेवणातून २५ जणांना विषबाधा; चारजण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2022 05:50 PM2022-03-21T17:50:58+5:302022-03-21T17:56:38+5:30
दिवसाचे हेच तेरवीचे जेवण अनेकांनी सायंकाळी घेतले. त्यापैकी बहुतांश नागरिकांना रविवारी सकाळपासून उल्ट्या होण्यास सुरुवात झाली. पण दिवसभर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, त्रास वाढल्याने सायंकाळी नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतली.
अचलपूर (अमरावती) : दिवसा झालेल्या तेरवीच्या कार्यक्रमाचे जेवण सायंकाळी करणाऱ्या अनेक नागरिकांना सकाळपासून विषबाधा झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. एकूण १४ नागरिकांना उपचारासाठी अचलपूर येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले. यात दोन बालकांचा समावेश आहे.
अचलपूर तालुक्यातील चमक येथे १९ मार्च रोजी हरिभाऊ चरोडे यांच्या तेरवीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला पाहुण्यांसह सहा गावांतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. दिवसाचे हेच तेरवीचे जेवण अनेकांनी सायंकाळी घेतले. त्यापैकी बहुतांश नागरिकांना रविवारी सकाळपासून उल्ट्या होण्यास सुरुवात झाली. पण दिवसभर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, त्रास वाढल्याने सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतली. चार नागरिकांची प्रकृती जास्तच बिघडल्याने त्यांना अमरावती येथे उपचाराकरिता रेफर करण्यात आले. यात निर्मला बुरंगे, प्रल्हादराव जाणे, गोपाल चरोडे, शीला हरी चरोडे यांचा समावेश आहे.
उपजिल्हा रुग्णालयात १० दाखल
अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दिनेश बुरंगे, योगश्री दिनेश बुरंगे, रमेश जानराव इंदूरकर, मंगला श्रीकृष्ण चरोडे, श्रीकृष्ण चरोडे, गंगाबाई आनंदराव बहुरूपी, निर्मला बुरंगे, ललिता विनोद चरोडे, स्नेहा विनोद चरोडे, सुषमा गोवर्धन चरोडे, गजानन देविदास चरोडे, स्वस्तिक दिनेश बुरंगे हे उपचार घेत आहेत.
अनेकांवर खासगीत उपचार
यातील अनेक नागरिक खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांवर डॉ. प्रसन्नकुमार सुदाम, डॉ. दीपाली जाधव, डॉ. शैलेश देवकर यांनी उपचार केले. अन्नातून विषबाधा झाल्याने या नागरिकांना ओकाऱ्या होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.