पोळा ‘लॉकडाऊन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 05:00 AM2020-08-19T05:00:00+5:302020-08-19T05:00:56+5:30
दरवर्षी गाव, खेडी, शहरातसुद्धा पोळ्यानिमित्त शेतकरी बैलाची सजावट, रंगरंगोटी करून पूजा-अर्चा करतात. मात्र, कोरोनामुळे शेतकऱ्यांनी घरीच बैलाचे पूजन, नैवद्य व अन्य विधिवत कार्य आटोपते घेतले. यंदा पोळ्याच्या सणाला फारसा उत्साह दिसून आला नाही. काही शेतकऱ्यांनी कुटुंबांतच बैलांचे पूजन करून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदा कोरोना संसर्गामुळे पोळा उत्सव सार्वत्रिकरीत्या साजरा करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने मनाई केली. त्यामुळे हा उत्सव घरीच मंगळवारी अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.
दरवर्षी गाव, खेडी, शहरातसुद्धा पोळ्यानिमित्त शेतकरी बैलाची सजावट, रंगरंगोटी करून पूजा-अर्चा करतात. मात्र, कोरोनामुळे शेतकऱ्यांनी घरीच बैलाचे पूजन, नैवद्य व अन्य विधिवत कार्य आटोपते घेतले. यंदा पोळ्याच्या सणाला फारसा उत्साह दिसून आला नाही. काही शेतकऱ्यांनी कुटुंबांतच बैलांचे पूजन करून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. अमरावती येथील नेहरू मैदान, राजापेठ परिसर, पंचवटी चौकालगतच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या रूरल इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात होणारा पारंपरिक पोळा उत्सव साजरा झाला नाही. परिणामी बैल सजावट स्पर्धांनाही ब्रेक लागला.
बडनेरा, वलगाव येथे सार्वत्रिक पोळा उत्सव साजरा झाला नाही. मध्यवर्ती कारागृहातील बैलांची रंगरंगोटी करून साज करण्यात आला होता. अधीक्षक रमेश कांबळे यांच्या हस्ते बैलांचे पूजन करून नैवेद्य खाऊ घालण्यात आले. ग्रामीण भागात रस्त्यांवर शुकशुकाट होता.
पोलिसांकडून सूचना
ग्रामीण भागात सार्वत्रिक पोळा सण साजरा होणार नाही, अशा सूचना पोलिसांनी सोमवार व मंगळवार अशा दोन दिवस सलग केल्या होत्या. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पोलीस ठाणेनिहाय सरपंच, पोलीस पाटलांच्या बैठकी घेऊन पोलिसांनीही निर्देश दिले.
बैलांच्या पाठीवर ‘स्लोगन’
तिवसा : कोरोनाच्या सावटातही मंगळवारी बैल पोळा सण साजरा करण्यात आला. तिवसा येथील शेतकºयांनी बैलाच्या पाठीवर आकर्षक व लक्षवेधी स्लोगन लिहिले. देशात सध्या अभिनेता सुशांतसिंग आत्महत्याप्रकरण गाजत आहे. यात एका बैलाच्या पाठीवर सुशांतसिंग व शेतकरी असे लिहून शेतकरी आत्महत्या व सुशांतसिंगची तुलना करण्यात आली. याशिवाय कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे रोजगार बुडाला. लॉकडाऊनविरोधात शेतकरीसुद्धा आक्रमक भूमिका घेत असल्याचे चित्र रेखाटण्यात आले.