पाच आस्थापनांवर पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:13 AM2021-04-23T04:13:34+5:302021-04-23T04:13:34+5:30
दुकान मालकांवर गुन्हे दाखल दर्यापूर : राज्य शासनाच्या नियमावलीनुसार अत्यावश्यक सेवेत असलेल्याच दुकानांना सकाळी ७ ते ११ ...
दुकान मालकांवर गुन्हे दाखल
दर्यापूर : राज्य शासनाच्या नियमावलीनुसार अत्यावश्यक सेवेत असलेल्याच दुकानांना सकाळी ७ ते ११ पर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी असून बाकी सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु काही दुकानदार आपली दुकाने उघडून ग्राहकांना वस्तू विक्री करत असल्याने नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. शहरात अशाच पाच दुकानदारांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांच्यावर बुधवारी गुन्हे दाखल केले.
यात साई आनंद गिफ्ट आयशा टॉवर, आरो कनेक्शन आयशा टॉवर, सोहम टायर बनोसा, मीरा दातार कंपनी तसेच आयसर स्ट्रक्चर यांच्यावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हे देखील दाखल केले आहेत. बुधवारी व गुरुवारी बसस्थानाक चौकात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यावर सुद्धा पोलिसांनी कारवाया केल्या. नगर पालिका कर्मचाऱ्यांनी विनाकारण फिरणाऱ्या व मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करत प्रत्येकी ३०० रुपये दंड देण्यात येत आहे. प्रत्येक वाहन थांबवून त्यांची विचारपूस करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवेसाठी सकाळी ७ ते ११ चा वेळ दिल्याने गुरुवारी सकाळी बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होते. यावेळी उन्हाचा पारा वर चढत असल्याने पोलिसांची मात्र मोठी दमछाक होत आहे. ठाणेदार प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात २५ ते ३० पोलिसांचा ताफा चौकाचौकांत तैनात करण्यात आला आहे.