निर्धोक वाहतुकीसाठी पोलिसांचा ‘ॲक्शन प्लॅन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:10 AM2021-07-24T04:10:15+5:302021-07-24T04:10:15+5:30
सीपी मॅडमचा ॲक्शन फोटो घेणे पान १ प्रदीप भाकरे अमरावती : बेदरकार वाहतूक, वाहनांच्या अस्ताव्यस्त रांगा, पदपथावरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण, ...
सीपी मॅडमचा ॲक्शन फोटो घेणे
पान १
प्रदीप भाकरे
अमरावती : बेदरकार वाहतूक, वाहनांच्या अस्ताव्यस्त रांगा, पदपथावरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण, अशा दुष्टचक्रात अमरावतीकर अडकला आहे. वाहनांची इतकी प्रचंड गर्दी की, पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागते. त्यातून अमरावतीकरांची सोडवणूक करण्यासाठी पोलीस आयुक्त आरती सिंग या ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करीत आहेत. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ज्या उपाययोजना आवश्यक आहेत, त्यांचा या ‘ॲक्शन प्लॅनमध्ये समावेश असेल. महापालिका प्रशासनाचे सहकार्य घेऊन आगामी दिवसात त्या प्लॅनची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.
शहरातील इतवारा बाजार, श्याम चौक, अंबादेवी रोड, राजापेठ, नमुना, टांगापडाव चौक, जवाहरगेट ते पुढे सराफा हा संपूर्ण व्यावसायिक परिसर. मात्र, येथील चौपदरीकरणाचे सिमेंट रोड फेरीवाले व पार्किंगने कह्यात घेतले आहे. महापालिकेकडून अतिक्रमणधारकांवर नियमित कारवाई केली जात असली, तरी पथकाची पाठ फिरताच पुन्हा त्याच जागेवर हातगाड्या लावल्या जातात. पथारी पसरल्या जातात. त्यावर कळस म्हणजे दुकानांसमोर रचलेले दुकानदारांचे साहित्य. त्यापुढे फेरीवाल्यांच्या गाड्या. त्यासमोरून पादचारी चालतील. त्यामुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडतो. परिणामी अपघातांची शक्यता बळावते.
या अनुषंगाने पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी वाहतूक व्यवस्थेतील कच्चे दुवे शोधण्याचा प्रयत्न चालवला आहे. ते कच्चे दुवे हेरून शहरातील वाहतूक सक्षम व निर्धोक करण्यासाठी त्यांनी वाहतूक पोलीस यंत्रणा कामाला लावली आहे. त्याचा परिपाक म्हणून ‘ ॲक्शन प्लॅन’ आकाराला येत आहे. त्या प्लॅनची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका व पोलीस हातात हात घालून काम करणार आहे. त्यासाठी महापालिका आयुक्तांशी पत्रव्यवहारासोबतच संवाददेखील साधला जाणार आहे.
बॉक्स
सिमेंट रस्ते छे, पार्किंग प्लेस!
शहरातील अरुंद रस्त्यांचे चौपदरीकरण, सिमेंटीकरण करण्यात आले. परिणामी, रस्ते चकाचक तर झाले. मात्र, त्या रस्त्यांचा अर्धाअधिक भाग दुचाकी, चारचाकीच्या पार्किंगने व्यापला. शहरातील पंचवटी ते बडनेरा असो वा राजकमल ते गांधी चौक असो, दिसते ती केवळ अस्ताव्यस्त लावलेली हजारो वाहने. त्यावरही पोलीस आयुक्तांनी कटाक्ष रोखला आहे.
काय असेल प्लॅन?
पार्किंग झोन, नो पार्किंग झोनची नव्याने मांडणी
सायलेंट झोनमधील परिस्थितीचा आढावा
व्यावसायिक संकुलांकडे पार्किंगची असलेली, नसलेली व्यवस्था
नव्याने आवश्यक असलेल्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची तैनाती
रांग साईड वाहतुकीला अटकाव
वाहतूक पोलिसांकडून पार्किंगबाबत ‘जनजागर’
कोट
इतवारा बाजार परिसर व अन्य काही बाजारपेठेच्या परिसरात पादचाऱ्यांना चालणेही जिकरीचे ठरते. अशा वर्दळीच्या ठिकाणांसह महानगरातील वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी महापालिकेचे सहकार्य घेऊ. ‘ॲक्शन प्लॅन’ करून तातडीने अंमलबजावणी केली जाणार आहे.
- आरती सिंह,
पोलीस आयक्त