पोलिसांची सतर्कता अन् दरोड्याचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:24 AM2021-02-18T04:24:03+5:302021-02-18T04:24:03+5:30
अमरावती : दरोडा टाकण्याच्या उद्देशाने अंधाराचा फायदा घेऊन फिरत असलेल्या पाचपैकी चार आरोपींना राजापेठ पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्यामुळे ...
अमरावती : दरोडा टाकण्याच्या उद्देशाने अंधाराचा फायदा घेऊन फिरत असलेल्या पाचपैकी चार आरोपींना राजापेठ पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्यामुळे राजापेठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोड्याचा प्रयत्न फसला. ही कारवाई एकनाथपुरम् परिसरात मंगळवारी मध्यरात्री करण्यात आली.
पोलीस सूत्रानुसार, गोपाल मधुकर थोरात (३०, रा. चवरे नगर), दिनेश पुंडलीकराव पालवे (२७), सोनू उर्फ प्रशांत चावरे (२९, रा. बेलपुरा), नयन दिलीप सोनवणे (२०, रा. झेंडा चौक अमरावती,) जितू उर्फे जितेश वसंत पिंजरकर (३१, रा. अमरावती) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून लोखंडी सळया, मूठ असलेला पेचकस, नायलॉन दोरी, सुती दोरी, मिरची पूड, दोन तलवारी, चायना चाकू आणि मुठीचा चाकू जप्त करण्यात आला.
पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. त्यामुळे यातील चार आरोपींना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्यांपैकी गोपाल थोरात व सोनू चवरे हा आरोपी तडीपार असतानाही ते उल्लंघन करून शहरात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात मिळून आले. आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३९९, ४०२, सहकलम १४२ महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंदविला. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात एपीआय प्रशाली काळे व पथकाने केली.