इंधन वेचणाऱ्याला लागली पोलिसांची गोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:38 AM2017-12-12T00:38:17+5:302017-12-12T00:39:04+5:30
एसआरपीएफ कॅम्प परिसरातील मैदानावर पोलिसांकडून गोळीबाराचा सराव सुरू असताना इंधन वेचणाऱ्या एका इसमाला गोळी लागली.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : एसआरपीएफ कॅम्प परिसरातील मैदानावर पोलिसांकडून गोळीबाराचा सराव सुरू असताना इंधन वेचणाऱ्या एका इसमाला गोळी लागली.
राजू मोहन सरसोदे (३५,रा. वडाळी) असे जखमीचे नाव असून, त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातून नागपूर हलविण्यात आले आहे.
सोमवारी सकाळी पोलिसांनी झाडलेली गोळी राजूला लागल्यावर तो घटनास्थळीच पडून होता. सायंकाळी ४ वाजता एसआरपीएफ कॅम्पमधील काही पोलिसांना तो जखमी अवस्थेत आढळला. काही पोलिसांना गोळी झाडण्याचे प्रशिक्षण देण्यात येते.
फ्रेजरपुरा ठाणेदारांची भेट
हा परिसर लाल झेंडे लावून मानवी शिरकावास प्रतिबंधित केला जातो. येते. ही बाब दंवडी पिटवून व बिगूल वाजवून सांगण्यात येते. सोमवारी सकाळी या क्षेत्रात लाकूडफाटा गोळा करणाऱ्या राजूच्या मांडीचा एका गोळीने वेध घेतला. तो जखमी होऊन खाली पडला. या घटनेची भनक पोलिसांना नव्हती. प्रशिक्षणाचे तास संपल्यानंतर पोलीस तेथून निघून गेले. मात्र, सायंकाळी ४ वाजता काही जवानांना राजू जखमी अवस्थेत आढळला. त्यांनी तत्काळ राजूला इर्विन रुग्णालयात नेले, अन्यथा मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती. फ्रेजरपुराचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी रुग्णालयात जाऊन घटनेचा आढावा घेतला.
पोलीस प्रशिक्षणात गोळी झाडण्याचा सराव करण्यापूर्वी बिगूल वाजवून, झेंडे लावून सूचना देण्यात येते. हा अपघात असून, नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
- दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त, अमरावती शहर.