तडीपार आरोपीच्या नातलगांचा ठाणेदारासह पोलिसांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 09:57 PM2017-09-04T21:57:17+5:302017-09-04T21:57:51+5:30
सण-उत्सवाच्या अनुषंगाने तडीपाराला पकडण्यासाठी गेलेल्या ठाणेदारासह पोलीस कर्मचाºयांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सण-उत्सवाच्या अनुषंगाने तडीपाराला पकडण्यासाठी गेलेल्या ठाणेदारासह पोलीस कर्मचाºयांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. फे्रजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडाळी परिसरात रविवारी रात्री ही घटना घडली.
याहल्ल्यात ठाणेदार पंजाब वंजारी यांच्यासह पोलीस कर्मचारी अमोल मनोहरे, अनुप झगडे व बाभुळकर जखमी झालेत. याप्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून चार जण पसार झाले आहेत. सण-उत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्था ठेवण्याच्या उद्देशाने पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी सुरु केली आहे. रविवारी फे्रजरपुराच्या ठाणेदारांसह काही पोलीस कर्मचारी वडाळीतील तडीपार सय्यद जफर सय्यद नासीर नामक आरोपीला शोधण्यासाठी गेले होते. दरम्यान तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून सय्यद जफर हा आरोपी घरात आढळून आला. पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी यांच्यासह सहायक ठाणेदार कुळकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक इंगळे, पोलीस कर्मचारी अमोल मनोहरे, अनूप झगडे, निंभोरकर आणि एका महिला पोलिसाने आरोपी सय्यद जफरला ताब्यात घेतले.
पोलिसांची काठी हिसकावून पळाले
सय्यद जफरला पोलीस वाहनात बसवीत असतानाच त्याच्या नातेवाईकांनी विरोध केला. सय्यद जफरच्या कुटुंबातील २० ते २५ जणांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. यावेळी सय्यदचा काका सय्यद गफ्फार सय्यद तुराब आणि त्याचा भाऊ सय्यद सरफराज सय्यद नासीर याने ठाणेदार वंजारी यांनाच धक्काबुक्की करून त्यांच्या हातीतील काठी हिसकावून त्यांना खाली पाडले. हा प्रकार सुरू असताना सय्यद जफरच्या कुटुंबातील सय्यद नूर सय्यद नासीर (३०), सय्यद रूस्तम सय्यद रशिद (२२), शहनाज परवीन सय्यद गफ्फार (४०) व शमाबी सय्यद रशिद (४०) यांनी पोलिसांवर हल्ला चढविला. सय्यद गफ्फारने ठाणेदार वंजारी यांच्यावर काठी व दगडाने हल्ला करून त्यांना जखमी केले.
ठाणेदारांना वाचविण्यासाठी गेलेले पोलीस अमोल मनोहरे, अनूप झगडे व बाभुळकर यांच्यावर सय्यद जफरच्या नातेवाईकांनी काठीने हल्ला केला. याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, सहायक पोलीस आयुक्त पंजाब डोंगरदिवे यांच्यासह सीपी स्क्वॉड, क्यूआरटी, आरसीपी पथक व फ्रेजरपुºयातील डीबी पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठले. पोलिसांनी सय्यद जफर, सय्यद सरफराज आणि सय्यद गफ्फारला अटक करून जखमी ठाणेदार वंजारी व तीन्ही पोलीस कर्मचाºयांना तत्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेमुळे वडाळी परिसरात मोठी गर्दी जमली होती. तणावाची स्थिती बघता पोलिसांचा मोठा ताफा वडाळी परिसरात तैनात होता. ठाणेदार वंजारी यांच्याजवळील काठी हिसकावून त्यांच्यावरच आरोपींनी हल्ला केला. धक्काबुक्कीनंतर फरार आरोपींनी पोलिसांची काठी घेऊन पलायन केले. याप्रकरणात पोलिसांनी आरोपींविरूद्ध भादंविच्या कलम ३०७, ३५३, १८६, १४७, १४८, ३३२, १३२, ५०६, २९४, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
सण-उत्सव काळात शांतता व सुव्यव्यस्था राखण्याच्या उद्देशाने पोलीस जबाबदारी सांभाळत आहे. अशात पोलिसांवर हल्ला केल्याची घटना निंदनीय आहे. आरोपींविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद करून तिघांना अटक केली
- दत्तात्रय मंडलिक,
पोलीस आयुक्त, अमरावती