आॅर्केस्ट्रा तिकीट विक्रीत पोलीस व्यस्त
By admin | Published: January 21, 2017 12:12 AM2017-01-21T00:12:35+5:302017-01-21T00:12:35+5:30
पोलीस कल्याण निधीच्या मदतीसाठी आयोजित आॅर्केस्ट्रा कार्यक्रमाची तिकीट विक्री युद्धस्तरावर सुरू आहे.
वेलफेअरच्या निधीसाठी कार्यक्रम : अर्धेअधिक पोलीस वसुलीत मग्न
अमरावती : पोलीस कल्याण निधीच्या मदतीसाठी आयोजित आॅर्केस्ट्रा कार्यक्रमाची तिकीट विक्री युद्धस्तरावर सुरू आहे. या कामात अर्धेअधिक पोलीस तिकीट विक्रीच्या वसुलीत गुंतल्यामुळे पोलीस विभागातील बहुतांश कामकाज व तपासकार्य थंडावले आहेत.
पोलीस आयुक्तालय हद्दीतील दहा पोलीस ठाण्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना या आॅर्केस्ट्रा कार्यक्रमानिमित्त प्रत्येक ठाणेदाराला १५ लाखांचे 'टागेट' देण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या माध्यमातून तब्बल दीड कोटींचा निधी गोळा होणार असून तो निधी पोलीस कल्याण निधीसाठी उपयोगात आणणार आहे. २० जानेवारीपासून ४ दिवस या आॅर्केस्ट्राचे आयोजन केले असून यामध्ये सिनेस्टार दीपाली सय्यद व प्रज्ञा जाधव यांची प्रमुख भूमिका राहील. मराठी ठसकेबाज लावण्या, धमाल नृत्यांचा मंत्रमुग्ध करणारा मनोरंजक कार्यक्रम अशी रुपरेषा या आॅर्केस्ट्राची राहील. अनेक वर्षांपासून पोलीस विभागातर्फे अशा प्रकारच्या कार्यक्रमांना ब्रेक लागला होता. मात्र, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी वेलफेअरचा पैसा वाढविण्याच्या उद्देशाने यंदा आॅर्केस्ट्राचे आयोजन केले आहे. या आॅर्केस्ट्राच्या तिकिटाची किंमत ही ३०० रुपये असल्यामुळे बहुतांश नागरिक तिकीट खरेदीकरिता आनाकाणी करीत आहेत. मात्र, या तिकीट विक्रीसाठी पोलिसांनी व्यापारी वर्गास वेठीस धरले आहे. सर्वसामान्य हातगाडीचालकांनाही याचा फटका बसत आहे. सर्वच पोलीस तिकीट विक्रीसाठी जोमाने काम करीत असल्याचे दिसून येत आहे.(प्रतिनिधी)
पोलीस कल्याण निधीच्या मदतीसाठी या आॅर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. या निधीचा वापर केवळ पोलिसांच्या कल्याणासाठीच केला जाईल. पोलिसांना तिकीट विक्रीचे उद्दिष्ट देण्यात आले आहेत. मात्र, सौजन्यपूर्णरीत्या तिकीट विक्री करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- दत्तात्रय मडंलिक, पोलीस आयुक्त