पर्स चोरणाऱ्या महिलेला सोडणे पोलिसांच्या येणार अंगलट
By admin | Published: January 29, 2017 12:30 AM2017-01-29T00:30:58+5:302017-01-29T00:30:58+5:30
पर्स चोरणारी महिला पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतरही चौकशी न करता तिला सोडून दिल्याचा प्रकार
गाडगेनगर पोलिसांचा प्रताप : ड्युटी आॅफिसर, कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता
अमरावती : पर्स चोरणारी महिला पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतरही चौकशी न करता तिला सोडून दिल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी गाडगेनगर पोलीस ठाण्यात घडला. हा कारभार गाडगेनगर पोलीस ठाण्यातील संबंधित ड्युटी आॅफिसर व पोलीस शिपायाच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. पोलीस आयुक्तांनीही याप्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.
अनेक दिवसांपासून पर्समधून दागिने किंवा रोख चोरी जात असल्याच्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यांत दाखल आहेत. वर्षभरात तब्बल आठ ते दहा गुन्हे घडले असून त्यांचे तपासकार्य अद्याप प्रलंबित आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी काही नागरिकांनी एका महिलेला पर्स चोरताना रंगेहात पकडले आणि गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधिन केले. मात्र, पोलिसांनी त्यामहिलेची चौकशी न करता सोडून दिले. ज्या महिलेची पर्स चोरी जाणार होती,तिने पोलीस तक्रार न केल्यामुळे गाडगेनगर पोलिसांनी ‘त्या’ महिलेची चौकशी न करता तिला सोडून दिले. शहरातील काही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पर्स चोरणाऱ्या महिलेच्या शोधात असताना गाडगेनगर पोलिसांनी केलेला हा बेजबाबदारपणा पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आला आहे. त्यामुळे संबंधित ड्युटी आॅफीसर, कर्मचाऱ्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.
तक्रार दाखल करण्यातही हलगर्जीपणा
४गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील जिजाऊनगरात हेमंत बुंरगे यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोखीसह ६४ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याघटनेची तक्रार घेताना गाडगेनगर पोलिसांनी अक्षम्य चुका केल्या असून तक्रारीत केवळ १५ हजारांचा माल चोरीला गेल्याचे नमूद केले आहे. त्यातच बुरंगे यांच्या घराचे दार बंद असतानाही उघड्या दारातून चोरांनी प्रवेश केल्याचे नमूद केले आहे. यागंभीर चुकांची तक्रार पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्याकडे करण्यात आली असून त्यासंबंधाने त्यांनी ठाणेदाराला सक्त सूचना दिल्या आहेत.
पर्स चोरणारी एक महिला गाडगेनगर पोलिसांच्या हाती लागली होती. मात्र, तक्रार न झाल्यामुळे संबंधित ड्युटी आॅफिसर व कर्मचाऱ्यांनी त्चौकशी न करता तिलासोडून दिले. यागंभीर प्रकाराबाबत संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
-दत्तात्रय मंडलिक,
पोलीस आयुक्त.