पोलीस कॉन्स्टेबलचा महिला वकिलावर हल्ला
By admin | Published: June 16, 2017 12:05 AM2017-06-16T00:05:49+5:302017-06-16T00:05:49+5:30
स्थानिक वकील संघाच्या महिला सदस्यावर एका पोलीस कॉन्स्टेबल व त्याच्या भावाने प्राणघातक हल्ला करून मारहाण केली.
वकील संघाचे लेखणीबंद आंदोलन : कारवाईची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वरुड : स्थानिक वकील संघाच्या महिला सदस्यावर एका पोलीस कॉन्स्टेबल व त्याच्या भावाने प्राणघातक हल्ला करून मारहाण केली. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेलेल्या महिला वकिलाची तक्रार घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. उलटपक्षी कॉन्स्टेबल आणि त्याच्या भावाच्या फिर्यादीवरून महिला वकिलावरच गुन्हा दाखल करण्यात आला. तालुका वकील संघाने या घटनेचा निषेध करून लेखणीबंद आंदोलन पुकारले. कॉन्स्टेबलसह त्याच्या भावावर कारवाई न झाल्यास राज्यात कामबंद आंदोलनाचा इशारा वकील संघाचे अध्यक्ष विनोद भोसे यांनी पत्रपरिषदेत दिला. महिला वकिलाला मारहाणीची घटना ११ जूनला घडली.
अॅड.शीतल भाऊराव नागले या वरूड बार असोसिएशनच्या सदस्य आहेत. शीतल यांच्या बहिणीचा काँस्टेबल पतीसोबत वाद सुरू आहे. याप्रकरणी पोलीस कॉँस्टेबलविरूद्ध पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली आहे. पोलीस कॉन्स्टेबल उमेश वाकपांजर आणि त्याचा भाऊ किशोर वाकपांजर हे ११ जूनला शीतल नागले यांच्या बहिणीच्या घरी आले व तिला आंदणात मिळालेल्या वस्तू शेंदूरजनाघाट येथे नेण्याचा प्रयत्न केला. घटनेची तक्रार नोंदविण्याकरिता वरूड ठाण्यात गेल्या असता त्यांची तक्रार घेण्यास पोलिसांनी नकार दिला. ४ तास बसवून ठेवल्यानंतरही तर उलट पोलीस कॉन्स्टेबल उमेश वाकपांजर व त्याचा भाऊ किशोर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शीतलविरूद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, ही कारवाई पक्षपातीपणे केल्याचा आरोप शीतल नागले यांनी केला आहे. प्राणघातक हल्ला करणाऱ्या कॉन्स्टेबल व त्याच्या भावावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वकील संघाने पत्रकार परिषदेतून केली. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष विनोद भोसे, पी.एल.वानखडे, डी.डी.महात्मे, सी.व्ही. थेरे, योगेश नगाले, तुषार घोरमाडे, शांतीभूषण छांगाणी, एम.पी.भोगे, निरंजन खडक्कर आदी उपस्थित होते.
सदर काँस्टेबल त्याच्या घरी वरूडला गेला होता. महिला वकील तेथे गेल्या आणि वाद घातला. त्यामुळे मारहाणीचा प्रकार घडला आहे.
- अभिनाष कुमार,
जिल्हा पोलीस अधीक्षक