आ अब लौट चले... कारागृहाचे कैद्यांना आवाहन, प्रशासनाकडृून थेट पत्रव्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2022 04:47 PM2022-05-19T16:47:21+5:302022-05-19T16:52:13+5:30
कोरोना आकस्मिक अभिवचन रजेवर गेलेले बहुतांश कैदी बाहेर रमराण झाले आहेत. कुटुंबाप्रती जिव्हाळा लागला. आता पुन्हा कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी परत जावे लागणार असल्याने काही कैदी अंडरग्राऊंड झाल्याची माहिती आहे.
गणेश वासनिक
अमरावती : कोरोना काळात कारागृहातील गर्दी कमी करण्यासाठी अटी, शर्थेीच्या आधारे काही कैद्यांना कोरोना आकस्मिक अभिवचन रजा मंजूर करण्यात आली होती. मात्र, दोन वर्ष कारागृहाबाहेर राहून शिक्षाधीन कैदी चांगलेच रमले आहेत. मात्र, राज्याच्या गृह विभागाने ४ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार आकस्मिक अभिवचन रजेवर गेलेल्या कैद्यांना कारागृहात परत येणे अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने कारागृहातून थेट रजेवरील कैद्यांना परत येण्यासाठी पत्रव्यवहार केला जात आहे. काही कैदी कारागृहात परतले आहेत.
राज्याच्या कारागृह विभागाचे उपसचिव अनिरूद्ध जेवळीकर यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या आदेशानुसार कोरोना आकस्मिक अभिवचन रजेवरील कैद्यांना पुन्हा कारागृहात परतण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील कारागृहातून रजेवर गेलेले तब्बल पाच हजार कैदी परत आणण्यासाठी कारागृह अधीक्षकांनी कैद्यांना पत्र पाठविण्यासह संबंधित यंत्रणांना सुद्धा पत्रव्यवहार चालविला आहे.
गत १५ दिवसात कोरोना आकस्मिक अभिवचन रजेवरील ५० टक्के कैदी कारागृहात परतल्याची माहिती आहे. रजेवरील कैदी पुन्हा कारागृहात कसे परत येतील, यासाठी पोलीस निरीक्षक, जामिनदारांना पत्र पाठवून अवगत केेले जात आहे. जिल्हा ग्रामीण पोलीस उपअधीक्षक, पोलीस उपायुक्तांना सुद्धा पत्रव्यवहार केला जात आहे. मे अखेरपर्यत रजेवरील कैदी परत येण्यासाठी कारागृह प्रशासनाने नियोजन आखले आहे.
काही कैदी अंडरग्राऊंड
कोरोना आकस्मिक अभिवचन रजेवर गेलेले बहुतांश कैदी बाहेर रमराण झाले आहेत. कुटुंबाप्रती जिव्हाळा लागला. आता पुन्हा कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी परत जावे लागणार असल्याने काही कैदी अंडरग्राऊंड झाल्याची माहिती आहे. त्यामुळे अभिवचन रजेसाठी ज्यांनी जामीन घेतला, त्यांना पोलिसांकडून पत्र प्राप्त झाल्याने भंबेरी उडाली आहे. रजेवरील कैदी कारागृहात परत आणण्यासाठी पोलीस प्रशासनाची मोठी कसरत होत आहे. यात काही कैदी अट्टल गुन्हेगार, खून, दरोड्यातील असल्याची माहिती आहे.
अभिवचन रजेवरील कैद्यांना थेट पत्र पाठविले जात आहे. ठाणेदार, जामीनदार, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा पत्रव्यवहार करण्यात येत आहे. आतापर्यत ६५ कैदी अभिवचन रजेवरून परतले आहेत. ३०० च्या जवळपास कैदी परत आणण्यासाठी नियाेजन सुरू आहे.
- भारत भोसले, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, अमरावती.