धार्मिक स्थळांसह संवेदनशील ठिकाणांवर लक्ष; मशिदीसमोर ‘खाकी’; अमरावतीत ८० फिक्स पॉईंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2022 12:26 PM2022-05-05T12:26:32+5:302022-05-05T12:32:54+5:30
शहरातील दहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ७० ते ८० फिक्स पाॅईंट लावण्यात आले आहेत.
अमरावती : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ४ मे रोजीची मुदत दिली होती. तरीदेखील भोंगे न काढल्याने राज्यात अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे पोलीस या मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मशिदींसह संवेदनशील व अतिसंवेदनशील ठिकाणांसह मिश्र वस्तीत पोलिसांची मोठी कुमक तैनात करण्यात आली आहे. मुंबई-पुण्याचे लोण इथपर्यंत पोहोचलेले नाही. परिणामी, शहर शांत आहे. शहरातील ८० फिक्स पाॅईंटवरून खाकीचे उपद्रवींवर लक्ष असेल.
औरंगाबादमध्ये १ मे रोजी झालेल्या मनसेच्या सभेत राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा लावून धरत ४ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. मशिदींवरील भोंगे काढले नाहीत, तर त्यापुढे हनुमान चालिसा पठण केले जाईल, असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. त्याअनुषंगाने पोलीस महासंचालकांनी सर्व घटकप्रमुखांना कायदा व सुव्यवस्था शाबूत ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस आयुक्त डाॅ. आरती सिंह या स्वत: त्यासाठी रस्त्यावर उतरून परिस्थितीचा धांडोळा घेत आहेत.
दरम्यान, शहरातील दहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ७० ते ८० फिक्स पाॅईंट लावण्यात आले आहेत. सर्व मशिदींसमोरदेखील पोलीस तैनात आहेत. डीसीपीद्वयांसह पाच सहायक पोलीस आयुक्त, २४ पोलीस निरीक्षक, ६५ पीएसआय व एपीआय, १२६० पोलीस अंमलदारांसह एसआरपीएफच्या दोन तुकड्या व ३०० होमगार्ड असा व्यापक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मिश्र वस्तीवरदेखील पोलिसांची नजर आहे. विशेष म्हणजे, बुधवारी पहाटे ४ च्या अजानपूर्वीच हा पोलीस बंदोबस्त विविध ठिकाणी तैनात करण्यात आला होता.
९७ जणांना कलम १४९ ची नोटीस
मनसेच्या ९७ कार्यकर्त्यांना कलम १४९ ची नोटीस देण्यात आली, तर ६७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यात मनसे व अन्य काही उपद्रवींचा समावेश असल्याची माहिती शहर पोलिसांकडून देण्यात आली. बुधवारी पहाटे ४ वाजतापासून तैनात करण्यात आलेला बंदोबस्त पुढील आदेशापर्यंत तैनात राहणार आहे.
मनसे पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई
परतवाडा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीसमोर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी दिलेला अल्टीमेटम पाहता कुठल्याच प्रकारचा जातीय तेढ निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त जुळ्या शहरात लावण्यात आला आहे. शहरातील मनसेच्या १४ कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध प्रतिकात्मक कारवाई करण्यात आली.