पोलिसांच्या धाकात तरूणाईचा ‘प्रेम दिन’
By admin | Published: February 15, 2017 12:01 AM2017-02-15T00:01:57+5:302017-02-15T00:01:57+5:30
‘व्हॅलेन्टाईन डे’ साजरा करण्यासाठी नेहमीप्रमाणे शहरातील तरूणाई उत्सुक असली तरी पोलिसांच्या करड्या नजरेखाली तरूणांना जीव मुठीत घेऊन ‘प्रेम दिन’ साजरा करावा लागला.
हिरमोड : वडाळी-छत्री तलाव, बांबू उद्यानातही फिरल्या पोेलीस व्हॅन, हॉटेल्स, कॉफी शॉप फुल्ल
अमरावती : ‘व्हॅलेन्टाईन डे’ साजरा करण्यासाठी नेहमीप्रमाणे शहरातील तरूणाई उत्सुक असली तरी पोलिसांच्या करड्या नजरेखाली तरूणांना जीव मुठीत घेऊन ‘प्रेम दिन’ साजरा करावा लागला.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विविध कॉफी शॉप, आईस्क्रीम सेंटर व शहरातील नामांकीत हॉटेल्समध्ये आपापल्या पार्टनर्सला भेटून प्रेमभावना व्यक्त केल्यात. वास्तविक एरवी शहरातील वडाळी तलाव, छत्री तलाव आणि वडाळी तलाव परिसरातील बांबू उद्यानात प्रेमीयुगुलांचा राबता असतोे. मात्र, मंगळवारी याठिकाणी पोलिसांनी गस्त वाढविल्याने जोडपी याठिकाणी फिरकलीच नाहीत. परंतु शहरातील क्रीडा संकुल, राजापेठ, कॅम्प, राजकमल चौकातील व काही कॉफी शॉप व आईस्क्रीम सेंटर्समध्ये तरूणाईची गर्दी दिसून आली.
याठिकाणी जोडप्यांकरिता बसण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तसेच हार्टच्या आकारचे फुगे व अन्य रोषणाई करून कॉफी शॉप वेगळ्या पद्धतीने सजविण्यात आले होते.
विवाहित जोडप्यांचा ग्रिटिंग कार्डस्वर भर
अमरावती : अनेक विवाहित जोडप्यांनी सुद्धा त्यांच्या पार्टर्नरसमवेत हा दिवस उत्साहाने साजरा केला. भेटवस्तुंची बाजारपेठ व्हॅलेन्टाईन सप्ताह सुरू होताच गजबजू लागते. एक-एक विशिष्ट दिवस साजरा करताना आपापल्या पार्टनर्सला वेगवेगळ्या वस्तू भेट देण्याचे फॅडच तरूणाईमध्ये निर्माण झाल्याने दुकानदारांनीही वेगवेगळ्या संकल्पना अंमलात आणून चित्ताकर्षक भेटवस्तू बाजारात उपलब्ध केल्या होत्या. मात्र, सोशलमिडियाच्या या जमान्यातही प्रेमवीरांचा शुभेच्छा कार्ड खरेदीकडे असलेला ओढा काही कमी झालेला नाही. विवाहित जोडप्यांनी ग्रिटिंग्स कार्ड खरेदीवर विशेष भर दिला.
बजरंग दलाने पकडले सहा प्रेमीयुगुल
बजरगं दलाचे महानगर संयोजक निरंजन दुबे, बंटी पारवानी, डियुक्स गोदवानी, प्रिदेव डेंढवाल, आर्यन देवकर, श्रीरंग वडनेरकर, सिद्धू सोळंकी व पवन श्रीवास यांनी मंगळवारी शहरात फिरून प्रेमीयुगुलांवर लक्ष केंद्रित केले होते. दरम्यान मालटेकडीवरील पाच प्रेमीयुगुलांना त्यांनी ताब्यात घेतले. तसेच वडाळी बगिच्यातील एका पे्रमीयुगुलाला ताब्यात घेऊन फे्रजरपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले.
शिकवणीवर्गांच्या बाहेरही धूम
शहरातील राठीनगर, गाडगेनगर, राधानगर, राजापेठ, रुख्मिणीनगर परिसरात सर्वाधिक शिकवणी वर्ग आहेत. अल्पवयीन विद्यार्थ्यांची या शिकवणीवर्गाच्या बाहेर धूम पाहायला मिळाली. याठिकाणी मुला-मुलींचे घोळके आढळून आले. शहरातील निवडक पानटपऱ्यांवर सुद्धा तरूणाईची गर्दी दिसून आली. सायंकाळी गाडगेनगर परिसरात तरुणाईने हा दिवस उत्साहात साजरा केला. मात्र, पोलिसांचा जबरदस्त वचक असल्याने अनेक तरूणांचा विरसही झाला.
दामिनी पथक तैनात
व्हॅलेन्टाईन डे साजरा करताना सार्वजनिक ठिकाणी कुठलीही अनुचित घटना घडू नये किंवा नियमांचे उल्लंघन होऊ नये, याकरिता सर्वच पोलीस ठाण्यांचे पोलीस तैनात करण्यात आले होते. दामिनी सुरक्षा पथकाने सुध्दा प्रेमीयुगुलांचे व महाविद्यालयीन तरुणांच्या अड्ड्यावर नजर ठेवली. तसेच मोबाईल व्हॅनमधील पोलीस तसेच साध्या वेषातील पोेलीस सुद्धा तैनात करण्यात आले होते.
गुलाब महागला
एरवी पाच ते दहा रुपयांना मिळणाऱ्या गुलाबाची मंगळवारी चक्क १५ ते २० रुपयांना विक्री झाली. मंगळवारी फुलांच्या बाजारपेठेत वेगळीच रंगत दिसून आली. पुण्याच्या व शिर्डीच्या ‘डोज’ गुलाबाला सर्वाधिक मागणी होती. त्याकरिता मागणीच्या २० टक्के अधिक गुलाब बाजारपेठेत विक्रीसाठी आले होते. पांढरा व पिवळा गुलाब सुद्धा विक्रीस आला होता. परंतु लाल गुलाबाला सर्वाधिक मागणी होती. शहरातील २५ फुले विक्रेत्यांची गुलाबाची फुले लाखोंच्या संख्येने विकली गेली. काही दिवसांपासून मंदावलेली फुलांची बाजारपेठे मागील दोन दिवसांत गजबजली. व गुलाबांची मागणी वाढल्याचे फुलविक्रेते अरुण गुल्हाने यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.