आरडीएक्स लिहिलेल्या गाड्यांवर पोलिसांची करडी नजर
By admin | Published: August 22, 2015 12:31 AM2015-08-22T00:31:14+5:302015-08-22T00:31:14+5:30
अमित बटाऊवाले हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी भरलेल्या नागपंचमीच्या यात्रेत पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
कडेकोट बंदोबस्त : राजकीय धुरंधरांचाही गँगला विरोध
अमरावती/अचलपूर : अमित बटाऊवाले हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी भरलेल्या नागपंचमीच्या यात्रेत पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान 'लोकमत'च्या वृत्ताची दखल घेत पोलिसांनी आरडीएक्स असे लिहिलेल्या गाड्यांवर करडी नजर ठेवली आहे. हत्याकांडातील ६ आरोपी अद्यापही फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
११ आॅगस्ट रोजी रेती तस्करीत सक्रिय असलेल्या बारुद गँगने अमित बटाऊवाले याची हत्या केली. काही राजकीय पदाधिकारी व विविध क्षेत्रातील लोक बारुद गँगच्या दहशतीला विरोध दर्शविण्यास पुढे आले आहेत. या हत्याकांडास महसूल विभागाचेही अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्याची जनतेची मागणी कायम आहे. एरवी उशिरापर्यंत गजबजलेले रस्ते आठ दिवसांपासून रात्री ११ वाजताच सामसूम होत आहेत. अचलपूर येथे गुरुवारी सरायपुऱ्यात श्रीकृष्ण पुलाजवळ सुंदर नारायणाच्या मंदिरासमोर यात्रा भरत असते. या यात्रेत ठाणेदार नरेंद्र ठाकरे, दुय्यम ठाणेदार अजय आखरे ह्यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
'लोकमत'ची दखल
जुळ्या शहरातील काही युवकांनी त्यांच्या दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांवर ‘आरडीएक्स’ असे अंकित केले असल्याचे वृत्त 'लोकमत'ने शुक्रवारी प्रसिध्द करताच पोलिसांनी आर.डी.एक्स. लिहिलेल्या वाहनांकडे नजर वळविली आहे. अशा वाहनांचा शोध घेऊ न त्या वाहनधारकांचा बारुद गँगशी काही संबंध आहे काय, याची माहिती पोलीस घेणार आहेत.
अमित हत्याकांडातील फरार आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत. त्यातील काही आरोपींच्या घरातील सर्व सदस्य आपआपल्या घरांना कुलूप लावून फरार आहेत. नागपंचमीच्या यात्रेला कुठलेही गालबोट लागू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला आहे.
- अजय आखरे,
पोलीस उपनिरीक्षक
रेती तस्करी कोणाच्या पाठबळाने सुरु होती हे नागरिक सांगतात. या गँगला पोलिसांची छुपी मदत होती, असे दिसून आले म्हणून त्यांची हिंमत वाढत होती. अमितच्या हत्येला संबंधित अधिकारीच जबाबदार आहेत, याची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केल्यास तत्थ्य उघड होईल. हत्याकांडातील आरोपी शाकीर ह्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, या मागणीसाठी किती नगरसेवक समोर येतील हे जनता बघणारच आहे.
- नरेंद्र फिसके, माजी उपनगराध्यक्ष
माजी शिवसेना तालुका प्रमुख.