लोटांगण आंदोलनात पोलीस, होमगार्ड आमनेसामने
By admin | Published: October 2, 2016 12:11 AM2016-10-02T00:11:29+5:302016-10-02T00:11:29+5:30
होमगार्ड सैनिकांच्या लोटांगण आंदोलनात पोलीस व होमगार्ड आमनेसामने आले होते.
आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल : महिला पोलिसांना धक्काबुक्की
अमरावती : होमगार्ड सैनिकांच्या लोटांगण आंदोलनात पोलीस व होमगार्ड आमनेसामने आले होते. आंदोलनकर्त्यांनी महिला पोलिसांशी धक्काबुक्की केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी स्थिती हाताळताना दोन पोलीस कर्मचारी जखमी झालेत. याप्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे नोंदविले.
होमगार्ड सैनिकांना ३६५ दिवस नियमित रोजगार मिळावा, महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार सर्व सोयी-सुविधा प्रदान कराव्यात. सेवानिवृत्त झाल्यावर १० लक्ष रुपये देण्यात यावे, 'सिव्हील डिफेंस हटाव, होमगार्ड बचाव' अशा विविध मागण्यांसाठी गृहरक्षक दलाचे राजेंद्रसिंह बलदेवसिंह बघेल यांनी शनिवारी लोटांगण आंदोलन केले. इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हे लोटांगण घालण्यात येणार होते. शनिवारी सकाळी सर्व होमगार्ड इर्विन चौकात एकत्रित आल्यानंतर लोटांगण आंदोलन सुरू होणार होते. मात्र, या आंदोलनाची पोलीस परवानगी घेण्यात न आल्याने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना मज्जाव केला. पोलीस आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत असताना आंदोलनकर्ते व पोलिसांची धक्काबुक्की सुरू झाली. यामध्ये काही आंदोलन महिलांनी महिला पोलिसांच्या अंगावर धावून गेल्या. आंदोलनकर्ता महिला व महिला पोलिसांमध्ये झटापट झाल्यामुळे गोंधळ उडाला होता. आंदोलनकर्त्यांच्या रोषाला आवर घालण्याकरिता पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करीत गर्दी पांगविली व आक्रमक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी राजेंद्रसिंग बघेल यांच्यासह आठ ते दहा महिला व पुरुषांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुध्द भादंविच्या कलम ३५३ अन्वये गुन्हे नोंदविले आहेत. (प्रतिनिधी)
परवानगी न घेतल्याने कारवाई
लोटांगण आंदोलनाची पोलीस परवानगी न घेतलेल्या पोलिसांनी आंदोलनकर्त्यांविरुद्ध कलम १३५, १८८ अन्वये गुन्हे नोंदविले. यामध्ये सुनील गजभिये, शहागार, सागर डहाके, सतीश सुलताने, अविनाश कुटकुटे, पवन मेश्राम, धरम तुमडे, शंशांक दुबे, नीलेश उघडे, अमोल सरडे, सुरेंद्र शेजव, विनोद रंगारी, कल्पना चचाने, शीतल कोवाची, मंगला महाजन, वंदना सोनटक्के, कल्पना मेश्राम, ज्योती मुधोळकर, ज्योती खंडारे, प्रिया दाहिडे, जयश्री मेश्राम, सुवर्णा सवई, रेखा गुढदे, चंद्रकला पोहळे, सुनंदा बोरकर यांचा सहभाग आहे.
दोन पोलीस
कर्मचारी जखमी
आंदोलनकर्त्यांच्या रोषाला आवर घालण्यास पोलिसांनी सुरूवात केल्यानंतर धक्काबुक्की सुरू झाली. यामध्ये पोलीस कर्मचारी महेंद्रसिंग येवतीकर व सचिन पिसे हे दोघे जखमी झालेत.
परवानगी न घेता आंदोलन केल्याने. आंदोलनकर्त्यांना 'डीटेन' करण्यात येत असताना होमगार्ड सैनिकांनी महिला पोलिसांना धक्काबुक्की केली. त्यामुळे आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून अटक केली.
के.एम.पुंडकर, पोलीस निरीक्षक, गाडगेनगर पोलीस ठाणे.