‘त्या’ गोंधळी वाहनचालकावर बरसला पोलीस हंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:16 AM2021-09-06T04:16:42+5:302021-09-06T04:16:42+5:30
अमरावती : जयस्तंभ चौकात पोलिसांशी हुज्जत घालून राडा घालणे एका दुचाकीचालकाला चांगलेच महागात पडले. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध सरकारी ...
अमरावती : जयस्तंभ चौकात पोलिसांशी हुज्जत घालून राडा घालणे एका दुचाकीचालकाला चांगलेच महागात पडले. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध सरकारी कामकाजात अडसर निर्माण करण्यासोबतच भादंविचे कलम १८६, ३४१, ३४ व मपोकाच्या कलम १०२, ११०, ११२, ११७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. इरफान खान जोरावर खान (२५, लालखडी), असे पोलिसांशी ओढाताण करणाऱ्या वाहनचालकाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊ नये म्हणून जुबेर मो. कुरेशी (२८, पठाण चौक) याने पोलिसांना अटकाव केला. त्याच्याविरुद्धदेखील गुन्हे नोंदविण्यात आले. त्याला पोलिसी खाक्या दाखविण्यात आला.
४ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० च्या सुमारास जयस्तंभ चौकातील उड्डाणपुलाखाली ही घटना घडली. इरफान खान हा एका १० वर्षीय मुलीला सोबत घेऊन जयस्तंभ चौकातून जात असताना त्याच्या दुचाकीला अन्य वाहनाने धडक दिली. त्यामुळे अगदी रस्त्यात दुचाकी उभी करून त्याने चांगलाच धिंगाणा केला. येणाऱ्या-जाणाऱ्यांना त्याने शिवीगाळ देखील केली. दुचाकीवर बसल्याबसल्या तो आरडाओरड करीतच राहिला. त्यामुळे शहर कोतवालीच्या ठाणेदार नीलिमा आरज घटनास्थळी पोहोचल्या. मात्र, इरफान खान कुणालाहु जुमानेना. त्याच्या दुचाकीवर मागे बसलेली बालिका भीतीने रडत होती. त्यामुळे एका पोलीस कर्मचाऱ्याने तिला त्याच्यापासून दूर केले. कवेत घेऊन तिला धीर दिला. त्यानंतर त्याला अटकाव घालण्यात आला. मात्र, या अर्ध्या तासाच्या गोंधळामुळे वाहतूक खोळंबली. बघ्यांचीही गर्दी जमली. कोतवाली पोलिसांनी इरफान शहाला ताब्यात घेतले. त्यानंतर गोंधळ शमला.
कोट
सार्वनजिक रस्त्यावर लोकांची गर्दी जमवून पोलिसांच्या शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे व शासकीय गणवेश पकडून पोलिसांना ओढाताण केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. २५ वर्षीय वाहनचालकाने जयस्तंभ चौकात आरडाओरड करून गोंधळ घातला.
नीलिमा आरज,
ठाणेदार, कोतवाली