पोलीस जीप शारदा देवीच्या मिरवणुकीत घुसली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 10:44 PM2018-10-15T22:44:04+5:302018-10-15T22:44:28+5:30
मंगरूळ चव्हाळा पोलिसांची जीप वेणी गणेशपूर येथील शारदादेवी स्थापनेच्या मिरवणुकीत शिरल्याने नऊ जण जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री ८ वाजता घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : मंगरूळ चव्हाळा पोलिसांची जीप वेणी गणेशपूर येथील शारदादेवी स्थापनेच्या मिरवणुकीत शिरल्याने नऊ जण जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री ८ वाजता घडली.
अपघातात विनोद रमेश भलावी (३६), कोकिळा संतोष लांजेवर (१३), दीपाली संतोष लांजेवार, तन्वी गणेश वासनिक (११), प्राची सुरेंद्र रंगारी (११), सुनील शेंडे (१०, सर्व रा. वेणी गणेशपूर) व बँडवादक नामदेव खंडारे (३९), योगेश खंडारे (२०) सहायक पोलीस उपनिरीक्षक एकनाथ आगाशे (५४, दोघे रा. मंगरूळ चवाळा) यांचा समावेश आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, वेणी गणेशपूरला शारदादेवी स्थापनेची बँड पथकाच्या तालात मिरवणूक निघाली. अचानक रस्त्याच्या कडेला उभी असलेली पोलीस जीप मिरवणुकीत घुसली व नऊ जणांना चिरडून जखमी केले. या घटनेने गावात तणाव निर्माण झाला होता. जखमींना अमरावती येथे उपचारार्थ हलविण्यात आले. तेथील २५ ते ३० नागरिक महिलांनी मंगरूळ चव्हाळा पोलिसांत रात्री ९ वाजता तक्रार दाखल करण्यास गेले, पण पोलिसांनी रात्री १२ वाजेपर्यंत फिर्याद दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. संगीता सुरोशे यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली. मात्र, एफआयआरची कॉपी मिळण्यासाठी पहाटे ४ वाजेपर्यंत काही नागरिक तेथेच थांबले.
पोलीस जीप रस्त्यावर एका कडेला उभी करून ड्रायव्हर लघुशंकेला गेला होता. वाहन रस्त्याच्या खाली घेण्याच्या प्रयत्नात पोलीस कर्मचारी गजानन महल्ले याचे नियंत्रण सुटले व जीप मिरवणुकीत घुसून लोक, मुले जखमी झाले.
- मनोज चौधरी, ठाणेदार