३१ पर्यंत पोलिसांची करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 12:03 AM2017-12-24T00:03:17+5:302017-12-24T00:03:27+5:30
थर्टी फर्स्ट, ३१ डिसेंबरच्या रात्री नवीन वर्षांच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळते. या उत्साहाच्या वातावरणात कायदा व सुव्यवस्थेला तडा जाऊ नये, यासाठी अमरावती पोलीस सज्ज झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : थर्टी फर्स्ट, ३१ डिसेंबरच्या रात्री नवीन वर्षांच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळते. या उत्साहाच्या वातावरणात कायदा व सुव्यवस्थेला तडा जाऊ नये, यासाठी अमरावती पोलीस सज्ज झाले आहे. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी नियोजनबद्ध बंदोबस्ताची संपूर्ण तयारी केली आहे. शहरात ४० ठिकाणी फिक्स पाईन्ट व बॅरिगेड लावून नाकाबंदी करण्यात येणार असून, ड्रन्क अॅन्ड ड्राईव्हवर लगाम लावण्यासाठी ब्रिथ अॅनालाईझर मशिन सज्ज ठेवल्या आहेत. २५ डिसेंबरच्या ख्रिसमस दिनापासून शहरात पोलिसांचा तडगा बंदोबस्त लावण्यात येणार असून पोलीस आयुक्तांसह पोलीस उपायुक्त, असीपी, पीआयसह बहुतांश पोलीस रस्त्यावर उतरून बंदोबस्त ठेवणार आहे. दहा ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी पाच फिक्स पाईन्ट लावून वाहनांची तपासणी केली जाईल. नववर्षाच्या स्वागताच्या उत्साहासाठी यंदा मद्यपींना चांगले दिवस आहे. यंदा मध्यरात्री १.३० वाजेपर्यंत मद्यप्रतिष्ठाने खुले राहणार असल्यामुळे मद्यपींच्या उत्साह द्विगुणीत झाला आहे.
उड्डाणपुलाचा मार्ग बंद ठेवणार
नववर्षाच्या स्वागतावेळी भन्नाट वाहने चालविणारे अपघात घडतवितात. काही वर्षांतील ३१ डिसेंबर रोजी उड्डाणपुलावर अपघात घडलेत. सुसाट वाहने चालवून उड्डाणपुलावरून खाली कोसळल्याच्या घटना आहेत. त्या दृष्टीने उपाययोजना म्हणून यंदा ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री शहरातील उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद केले जाईल.
थर्टीफर्स्टला आॅल आऊट आॅपरेशन
सीपी दत्तात्रय मंडलिक यांच्या आदेशानुसार ३१ डिसेंबर रोजी आॅल आऊट आॅपरेशन राबविले जाईल. यावेळी ९० टक्के पोलिसांना नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात केले जाणार आहे. फिक्स पाईन्डवर एक अधिकारी व चार पोलीस कर्मचारी व वाहतूक पोलीस तैनात राहील. हॉटेल, ढाबे तपासणीसाठी वेगळे पोलीस राहणार आहेत.