पोलिसांचे आॅपरेशन निवडणूक
By admin | Published: October 13, 2014 11:15 PM2014-10-13T23:15:17+5:302014-10-13T23:15:17+5:30
विधानसभा निवडणुकीचा कॉऊंटडाऊन सुरु झाला असून पोलीस विभागाने आॅपरेशन निवडणूक संदर्भांत धुरा सांभाळण्याकरिता नियोजन आखले आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी
अमरावती : विधानसभा निवडणुकीचा कॉऊंटडाऊन सुरु झाला असून पोलीस विभागाने आॅपरेशन निवडणूक संदर्भांत धुरा सांभाळण्याकरिता नियोजन आखले आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी याकरिता अमरावती, बडनेरा मतदारसंघांसोबतच तिवसा व धामणगाव येथील काही बुथवर अमरावती पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांची करडी नजर राहणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी सोमवारी पत्रपरिषेदतून दिली आहे.
जिल्ह्यात बुधवारी (१५ आॅक्टोबर) विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील ८ मतदार संघात निवडणूक होणार आहेत. त्यामध्ये पोलीस आयुक्तालय हद्दीतील १० पोलीस ठाण्यांतर्गत मतदान प्रक्रिया सुरळित पार पडावी याकरिता पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहेत. अमरावतीमध्ये २६६, बडनेरात २९६ तिवस्यात ९७ व धामणगाव रेल्वेत ४ मतदान केंद्रांवर अमरावती शहर आयुक्तालयातील पोलिसांची करडी नजर राहणार आहे. या चार निवडणूक क्षेत्रामध्ये २६७ इमारती असून त्यामध्ये ६६३ बुथ राहणार आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस विभागाने परिपूर्ण सुरक्षेसाठी यंत्रणा कामी लावली आहे, अशी माहिती पत्रपरिषदेतून पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी दिली. यावेळी पोलीस उपायुक्त सोमनाथ धार्गे व बी. के. गावराने यांची उपस्थिती होती.