बहिरमध्ये पोलीस गस्त वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:13 AM2020-12-22T04:13:42+5:302020-12-22T04:13:42+5:30
नो टिफीन, नो रोडगे अनिल कडू परतवाडा : बहिरम यात्रा रद्द असली तरी दरवर्षीप्रमाणे यंदाही बंदोबस्ताकरिता पोलीस यात्रेत दाखल ...
नो टिफीन, नो रोडगे
अनिल कडू
परतवाडा : बहिरम यात्रा रद्द असली तरी दरवर्षीप्रमाणे यंदाही बंदोबस्ताकरिता पोलीस यात्रेत दाखल झाले आहेत. त्यांनी यात्रा परिसरात आपली राहुटी टाकली आहे. त्यात त्यांनी पोलीस चौकी थाटली आहे. यात्रा परिसरासह मंदिरावरही त्यांनी गस्त वाढवली आहे.
यात्रा परिसरात कुणालाही भोजनावळी, भंडाऱ्याची परवानगी नाही. शिदोरी आणून समूहाने जेवण करण्यास, जेवन देण्यास पोलिसांनी मनाई केली. ‘नो टिफीन, नो रोडगे’चा फतवाच त्यांनी काढला. यादरम्यान असे कुणी केल्यास त्यांच्याविरुद्ध पोलीस गुन्हे दाखल करणार आहेत.
यात्रेदरम्यान बहिरमबाबांच्या दर्शनाला मंदिरात येणाऱ्या भाविकांवर सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेवणार आहेत. याकरिता मंदिर व्यवस्थापनाने मंदिरासह परिसरात एकूण आठ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. या कॅमेऱ्यांच्या मदतीला पोलीसही मंदिरावर तैनात राहणार आहेत.
दरम्यान, बहिरम यात्रा सुरू करण्यात यावी. यात्रा परिसरात व्यवसायिकांना दुकाने लावण्यास अनुमती देण्यात यावी, या अनुषंगाने निवेदनासह जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चाही करण्यात आली.
बॉक्स
३१ डिसेंबरनंतर बघू
शासनस्तरावरून ३१ डिसेंबरनंतर नव्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यास, यात्रेच्या अनुषंगाने काही वेगळे निर्देश मिळाल्यास बहिरम यात्रा सुरु करण्याबाबत विचार करता येईल. पण, याकरिता शासननिर्देशांची वाट बघावी लागेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
बॉक्स
चक्काजाम मागे
बहिरम यात्रा सुरू करण्याकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता यात्रेत दरवर्षी दुकाने थाटणाऱ्या परिसरातील लहान-मोठ्या व्यावसायिकांनी २१ डिसेंबरला चक्काजाम करण्याचे ठरविले होते. पण, जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट निर्देशांनंतर त्यांनी चक्काजाम रद्द केला. ३१ डिसेंबरनंतर यात्रेच्या अनुषंगाने काय निर्देश येतात, याकडे आता व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.
कोट
बहिरम यात्रा परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. यात्रा परिसरात भंडारा, जेवण करण्यास मनाई आहे. तसे करणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील.
- सचिनसिंह परदेशी, ठाणेदार, शिरजगाव कसबा.