पोलीस संरक्षणाचा ग्रामपंचायतीमध्ये ठरावच झाला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:09 AM2021-06-18T04:09:40+5:302021-06-18T04:09:40+5:30
नांदगांव पेठ : जागा खाली करण्यासाठी ग्रामपंचायतीने पोलीस संरक्षण मागणीसाठी कोणताही ठराव घेतलेला नसून ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी खोटी ...
नांदगांव पेठ : जागा खाली करण्यासाठी ग्रामपंचायतीने पोलीस संरक्षण मागणीसाठी कोणताही ठराव घेतलेला नसून ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी खोटी व दिशाभूल करणारी माहिती खेळाडूंना दिल्याचे स्पष्ट झाले आहे. खुद्द ग्रामविकास अधिकारी फाटे यांनी त्या युवकाला लेखी उत्तर दिल्याने ही बाब उघडकीस आली. गेल्या अनेक दिवसांपासून निलेश रघुवंशी हा युवक याबाबत ग्रामपंचायतीकडे माहिती मागत होता. मात्र, ग्रामपंचायतीच्यावतीने टाळाटाळ करीत असल्याने अखेर त्या युवकाने मंगळवारी पेट्रोलची बाटली घेऊन ग्रामपंचायतीमध्ये प्रवेश केला होता.
बाळापूरे ले आऊटमधील खुल्या जागेवर वीर केसरी क्रीडा मंडळाचे खेळाडू कबड्डी खेळतात. पुसदकर महाविद्यालय व वीर केसरी मंडळ यांच्यामध्ये हा वाद सुरू असून ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र, विभागीय आयुक्तांनी वीर केसरी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना जागा खाली करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने पदाधिकाऱ्यांना व खेळाडूंना जागा खाली करण्याची धमकी दिली. शिवाय उद्या पोलीस बंदोबस्तात जागा खाली करून घेऊ असा इशाराही दिला. मात्र, पोलीस संरक्षणासाठी ग्रामपंचायतीने ठराव घेतला का? त्याचे शुल्क भरले का? म्हणून निलेश रघुवंशी या युवकाने ग्रामपंचायतीकडे माहिती मागितली होती. परंतु ग्रामपंचायतीने आजवर टाळाटाळ करीत माहिती दिली नाही.
उत्तर न मिळाल्याने त्रस्त झालेल्या निलेश रघुवंशी याने मंगळवारी दोन बाटल्या पेट्रोल सोबत घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात धडक दिली व माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या अन्यथा मी आत्मदहन करतो, असा इशारा दिला. त्यामुळे प्रशासनाने लगेच दखल घेत असा कोणताही ठराव झाला नसल्याचे प्रमाणपत्र लेखी स्वरूपात रघुवंशी याला दिले.
बॉक्स
निलेशवर गुन्हा दाखल
ज्वलनशील पदार्थ शासकीय कार्यालयात घेऊन जाऊन आत्मदहनाची धमकी दिल्याप्रकरणी तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ग्रामपंचायत लिपिक राहुल बोडखे यांच्या तक्रारीवरून निलेश रघुवंशी व बैस नामक युवकावर भादंवि २८५,५०६,३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.