पोलिसांनी परतविले ३०० गोवंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 10:06 PM2019-02-17T22:06:05+5:302019-02-17T22:06:22+5:30
तालुक्यातील बऱ्हाणपूर-बेलोरा मार्गाने ३०० गोवंश शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास पायी नेण्यात येत होते. याची माहिती बजरंग दल कार्यकर्त्यांकरवी पोलिसांना देण्यात आली. जनावरांची चौकशी केल्यानंतर रविवारी ती जनावरे सोडून देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदुर बाजार : तालुक्यातील बऱ्हाणपूर-बेलोरा मार्गाने ३०० गोवंश शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास पायी नेण्यात येत होते. याची माहिती बजरंग दल कार्यकर्त्यांकरवी पोलिसांना देण्यात आली. जनावरांची चौकशी केल्यानंतर रविवारी ती जनावरे सोडून देण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून जनावरांच्या अवैध वाहतुकीमुळे चांदूर बाजार तालुका सातत्याने चर्चेत राहिला आहे. शनिवारी अमरावती येथील व्यापाऱ्याने मोर्शी कृषिउत्पन्न बाजार समिती मधून ३०० गोवंश पशू खरेदी केले. ही जनावरे बºहाणपूर ते बेलोरा मार्गे अमरावतीकडे पायी नेण्यात येत होती. बेलोरा येथील बजरंग दल कार्यकर्त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तात्काळ माहिती चांदूर बाजार पोलीस ठाण्याला दिली. ठाणेदार अजय आकरे यांनी घटनास्थळ गाठून सर्व जनावरे बेलोरा येथील जिल्हा परिषद शाळेत पोलीस निगराणीत ठेवले. यासोबतच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये करिता पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी काही व्यापारी आले आणि जनावरे आपल्या मालकीची असल्याचे सांगत जनावरांच्या कायदेशीर पावत्या पोलिसांना दाखवल्यामुळे बजरंग दल व गावकºयांच्या ताब्यात असलेल्या सर्व जनावरांची रविवारी सकाळी सुटका करावी लागली.
तालुक्यातील बेलोरा-वाठोडा मार्गावर १५ फेब्रुवारीला सहा मिनी ट्रक पकडून २७ गोवंशांची सुटका करण्याचे ताजे प्रकरण आहे. विशेष म्हणजे, ही दोन्ही प्रकरणे मोर्शी बाजार समितीशी जुळलेली आहेत.