महेंद्री जंगल वाचविण्यासाठी निघालेली दुचाकी रॅली पोलिसांनी पुसल्यातून परतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:23 AM2020-12-03T04:23:29+5:302020-12-03T04:23:29+5:30
महेंद्री जंगल संरक्षित करून अभयारण्य करण्याच्या वनविभागाच्या अहालचाली सुरू झाल्यामुळे आदिवासीबहुल गावांतील नागरिक तसेच शेतकऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. महेंद्री ...
महेंद्री जंगल संरक्षित करून अभयारण्य करण्याच्या वनविभागाच्या अहालचाली सुरू झाल्यामुळे आदिवासीबहुल गावांतील नागरिक तसेच शेतकऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. महेंद्री अभयारण्य हटाव कृती समितीच्या माध्यामातून समिती कार्य करीत आहे. गोरगरीब आदिवासींचे रोजगार हिस्कावला जाणार, शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा त्रास होऊन पिकांची नासाडी होणार, तर आदिवासी बांधव भूमिहीन होऊन बेरोजगारी वाढण्याच्या संभाव्य धोक्यामुळे या अभयारण्याला कसून विरोध होत आहे. दुसरीकडे वन्यजीवप्रेमी, संस्था महेंद्र अभयारण्य झाले पाहिजे म्हणून प्रयत्नरत आहे. याकरिता शासनस्तरावर प्रयत्न झाले. २ डिसेंबरला सकाळी ११ वाजता अमरावती ते महेंद्री जंगलपर्यंत १२० दुचाक्या घेऊन महेंद्री जंगल वाचावा, अशी रॅली काढण्यात आली. यात वन्यजीव प्रेमी सावंत देशमुख, विशाल बनसोड, सचिन आंजीकर, जयंत वडतकरसह कला पथके सहाभागी होते. परंतु रॅली पुसल्यापर्यंत येताच महेंद्री अभयारण्य विरोधी कृती समितीऱ्या पदाधिकाऱ्यांनी हातात फलके घेऊन रस्ता रोखला. याबाबत शेंदूर्जनाघाट पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार श्रीराम गेडाम, एपीआय शुभांगी थोरातसह पोलीस ताफा घटनास्थळावर दाखल झाला. यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिसांनी समर्थनीय आणि विरोधकांची समजूत घालून सदर रॅली पुसल्याहून परत पाठविली.
अमरावती ते महेंद्री वन्यजीवप्रेमींची दुचाकी रॅली बुधवारी आली होती. पंढरी येथे महेंद्री अभयारण्य विरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा विरोध केला. याची माहिती मिळताच पोलीस ताफा पाठवून त्यांची समजूत घातली. यात दोन्ही गटांनी सहकार्य केले, असे शेंदूरजनाघाटचे ठाणेदार श्रीराम गेडाम यांनी सांगितले.