'ती'चा रेल्वेसमोर झोकून देण्याचा प्रयत्न; तितक्यात पोहोचली 'खाकी'
By प्रदीप भाकरे | Published: October 6, 2022 06:49 PM2022-10-06T18:49:15+5:302022-10-06T18:49:37+5:30
रेल्वे स्टेशनवर आत्महत्या करत असलेल्या महिलेचा पोलिसांनी जीव वाचवला.
अमरावती : बस्स, संपले, आता जगायचेच नाही. आता केवळ मरणच, असा आतातायी विचार करून तिने चक्क बडनेरा रोडवरील रेल्वे ट्रॅक गाठला. रेल्वेसमोर झोकून देऊन प्राण त्यागायचे, असे मनोमनी ठरवत ती रेल्वे ट्रॅकवर सुसाट धावू लागली. ही माहिती मिळताच 'खाकी'ही पोहोचली. ती पुढे, अन् खाकी मागे. अखेर १५/२० मिनिटांनी महिलापोलिसांनी तिला ट्रॅकवरून मागे सारले.
४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास अमरावती-बडनेरा रेल्वे ट्रॅकवरील सिपना कॉलेजजवळील रेल्वे रुळावर ही घटना घडली. राजापेठ पोलिसांनी तिचे प्राण वाचविले. तिचे समुपदेशन करून तिला सुखरूप तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले. एक २२ वर्षीय तरूणी मानसिक तणाव व नैराश्यातून रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात सिपना कॉलेजजवळ रेल्वे रुळावर पळत असल्याची माहिती राजापेठच्या बिट मार्शलला मिळाली. त्यांनी त्याबाबत ठाणेदार मनीष ठाकरे यांना लागलीच कळविले. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार मनीष ठाकरे ताफ्यासह घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळ बडनेरा ठाण्याच्या हद्दीत असल्याने तेथील पोलिसांनाही माहिती देण्यात आली. सोबतच ठाणेदार मनीष ठाकरे यांनी रेल्वे पोलीस निरिक्षक शर्मा यांच्याशी संपर्क साधून त्या मार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वेगाड्या थांबविण्यास सांगितले. दामिनी पथकालाही पाचारण करण्यात आले.
ती समोर अन् पोलीस मागे
ठाणेदार ठाकरे तेथे पोहोचले असता, ती तरूणी रेल्वे ट्रॅकवर धावताना दिसली. महिला पोलिसांनी तिला साद घातली. मात्र कुठलाही प्रतिसाद न देता ती धावत राहिली. ती समोर अन् पोलीस मागे. अखेर एक किमी अंतरावर ती स्वत:च थांबली. महिला पोलिसांनी लागलीच तिला रेल्वे ट्रॅकच्या दूर नेले. यावेळी ठाणेदार मनीष ठाकरे यांनी तिची विचारपूस केली. त्यामुळे ती आत्महत्येच्या आत्मघातकी विचारांपासून मागे फिरली. तिने मानसिक व आर्थिक तणावात असल्याचे सांगितले. बराच वेळ समजूत काढल्यानंतर ती शांत झाली. त्यानंतर तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.
असंबंद्ध केली बडबड
ठाणेदार ठाकरे यांच्यासह महिला पोलीस अधिकारी अंमलदारांनी तिला प्रथम धीर दिला. तिच्याकडून कारण समजून घेतले. मात्र पहिला अर्धा तास ती असंबद्ध बडबडत राहिली. पुढे बॉटलभर पाणी गटागट पित तिने दिर्घ उसासा सोडला. मॅथची शिकवणी लावावी लागेल, त्यासाठी २१ हजार रुपये महिना द्यावा लागेल, तेवढी पैसे नाहीत, मी लहानग्यांची ट्युशन घेते. मात्र त्यातून केवळ घरखर्च भागतो, पुढे काय, असा प्रश्न तिला पडल्याची पोलिसांच्या लक्षात आले. आर्थिक विवंचना आणि त्यापाठोपाठ आलेल्या मानसिक नैराश्यामुळे तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र खाकीच्या सजगतेने तिचे प्राण वाचले.