पोलीस म्हणतात, ‘इकडे आड...’

By admin | Published: February 22, 2016 12:42 AM2016-02-22T00:42:07+5:302016-02-22T00:42:07+5:30

फे्रजरपुरा वाहतूक शाखेत कार्यरत दोन पोलिसांच्या निलंबनाचे खात्यात तीव्र पडसाद उमटले आहे.

The police say, 'Around here ...' | पोलीस म्हणतात, ‘इकडे आड...’

पोलीस म्हणतात, ‘इकडे आड...’

Next

निलंबनाचे पडसाद : वाहतूक शाखेत खळबळ, कारवाई करायची कशी?
अमरावती : फे्रजरपुरा वाहतूक शाखेत कार्यरत दोन पोलिसांच्या निलंबनाचे खात्यात तीव्र पडसाद उमटले आहे. रीतसर चालान देऊन पावती फाडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळत असेल तर काम करायचे कसे, असा प्रश्न यानिमित्ताने वाहतूक कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला.
शनिवारी २० फेब्रुवारीला दुपारी ५ च्या सुमारास गजानन तायडे आणि राजेश इंगोले (ब.नं.१२२८) या वाहतूक कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तांच्या आदेशाने निलंबित करण्यात आले. आदेश डावलून ते चालान बुकचा वापर करताना आयुक्तांच्या नजरेस पडले होते. निलंबन आदेश धडकल्यानंतर इर्विन चौकातील वाहतूक शाखेसह अन्य कार्यालयातही खळबळ माजली. ‘कारवाई केली तरी कारवाई आणि नाही केली तरी कारवाई’ अशा परिस्थितीत वाहतूक कर्मचाऱ्यांसाठी ‘इकडे आड तिकडे विहिर’ अशी नवी विवंचना निर्माण झाल्याची प्रतिक्रिया अनेक वाहतूक पोलिसांनी नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’कडे व्यक्त केली. वाहतूक नियंत्रण ही आमची जबाबदारी आहेच. मात्र नियमभंग करणाऱ्यास मग तसेच सोडून द्यायचे का? आणि तसे झाल्यास कारवाईचा बडगा उगारला जाणार नाही, याची शाश्वती देता येणेसुध्दा शक्य नसल्याची या कर्मचाऱ्यांची संयुक्त प्रतिक्रिया आहे. यासंदर्भात निलंबित झालेल्या एका पोलिसाने आपली व्यथा मांडली. हेड मोहररने चालान बुक दिले होते. त्यामुळेच पोलीस पेट्रोलपंपानजीक चालान फाडले, असे त्याचे म्हणणे आहे.
शहरातील मुख्य चार चौकांसह पीएसआय, एपीआय आणि पीआयकडेच चालानबुक ठेवण्याचे आदेश झाल्यानंतर अन्य कर्मचाऱ्यांजवळचे चालान बुक काढून घेण्यात आले. शुक्रवारी पोलीस पेट्रोलपंपाजवळ कार्यरत असलेल्या वाहतूक कर्मचाऱ्यांकडून केवळ १ केस करण्यात येऊन १०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला होता. त्यावर पोलीस उपायुक्तांनी संबंधित निरीक्षकांना जाबही विचारला. त्या पार्श्वभूमीवर फे्रजरपुरा वाहतूक विभागातील हेडमोहररने त्या वाहतूक कर्मचाऱ्यांना चालान बुक दिल्याचे अन्य वाहतूक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. शनिवारी दुपारी ५ च्या सुमारास डीसीपी मोरेश्वर आत्राम यांनी या वाहतूक कर्मचाऱ्यांना एका पोलीस कर्मचाऱ्याच्या विनाक्रमांकाच्या दुचाकीवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. कारवाई करीत असतानाच आयुक्त त्या मार्गावरून गेले व पुढील कारवाई केल्या गेली.
यंत्रणेचा उपायुक्तांशी असहकार
अपूर्वा देऊळगावकरच्या अपघाती मृत्यूनंतर का होईना वाहतूक नियंत्रणाचा प्रयत्न होऊ लागला. उपायुक्त नितीन पवार यांनी याबाबत स्तुत्य पुढाकार घेतला. मात्र अन्य यंत्रणेचे त्यांना फारसे सहकार्य मिळू शकले नाही. फंडिंग येईपर्यंत अन्य यंत्रणा कामाला लागणार नाहीत. त्यामुळे निव्वळ कागदी घोडे नाचवून सहकार्याचा बागुलबुवा करणे सुरू आहे. इर्विन चौकातील वाहतूक कार्यालयाजवळ गतिरोधक बनविण्यात यावे, अशा मागणीचे पत्र वाहतूक शाखेने वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठविले. मात्र अद्यापपर्यंत पोलिसांनीच मागणी केलेल्या, गतिरोधकालाही मुहूर्त मिळालेला नाही. अन्य यंत्रणेचा असहकार यातून स्पष्ट होतो.

Web Title: The police say, 'Around here ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.