राजकुमार पटेलांच्या घरात पोलिसांचे सर्च आॅपरेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 10:38 PM2018-01-13T22:38:29+5:302018-01-13T22:39:14+5:30
खारी येथील पोलीस वाहनावर हल्ला चढविल्याप्रकरणी हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असणारे माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या धारणी येथील घराची पोलिसांनी अटक करण्यासाठी झाडाझडती घेतली.
आॅनलाईन लोकमत
धारणी : खारी येथील पोलीस वाहनावर हल्ला चढविल्याप्रकरणी हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असणारे माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या धारणी येथील घराची पोलिसांनी अटक करण्यासाठी झाडाझडती घेतली. मात्र त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. शुक्रवारी राजकुमार पटेलांचे अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय अचलपूर येथून खारीज करण्यात आल्यानंतर शनिवारी ही कारवाई करण्यात आली.
शुक्रवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय अचलपूर येथे चार आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्जावर निर्णय झाला. यात दोघांना जामीन मिळविण्यात यश आले, तर दोघांचा अर्ज खारीज झाल्याने त्यांना अचलपूर येथेच अटक करण्यात आली. अटक केलेल्यांमध्ये गोलू ऊर्फ संजय बाबूलाल कापसे (३६), मिश्रीलाल मोतीलाल कापसे (५५) यांचा समावेश आहे. ज्यांना अटकपूर्व जामीन मिळाला त्यांचे नाव मुकेश कैलास इंगळे व राजेश कैलास इंगळे (दोन्ही रा. अंबाडी, ता. धारणी) असे आहे.
शुक्रवारी अचलपूर न्यायालयातून जामीन अर्ज खारीज झाल्यापासून माजी आमदार राजकुमार पटेल हे पसार झालेत. पोलीस त्यांची पाळत ठेवत असतानाच त्यांनी फरार होण्यात यश मिळविल्याने पोलिसांच्या पदरी पुन्हा निराशा आली. शनिवारी सकाळी पोलीस ताफा ठाणेदार किशोर गवई यांच्या नेतृत्वात राजकुमार पटेल यांच्या घरी ११ वाजता पोहोचले. त्यांनी घराचा संपूर्ण शोध घेतला. मात्र, राजकुमार पटेल न सापडल्याने पोलिसांची धडपड सुरूच आहे.
दोघांना अटकपूर्व जामीन
पोलिसांकरिता अत्यंत महत्वाचे असलेले या प्रकरणात दोन आरोपींना अटकपूर्व जामीन प्राप्त करण्यात यश मिळाले आहे. त्यांची बाजू अॅड. राम शुक्ला आणि संदीप ठाकूर यांनी यशस्वीरित्या मांडीत त्यांची जामीन मिळविली. या प्रकरणी सहा आरोपी तुरूंगात असून त्यावर सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. यात तीन महीला आरोपींचा समावेश आहे. आता सोमवारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.