बच्चू कडू, राजकुमार पटेल यांच्या घरांना पोलीस सुरक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 01:53 PM2022-06-27T13:53:39+5:302022-06-27T14:02:52+5:30

कडू, पटेल यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने शनिवारी रात्रीपासून त्यांच्या घरांना पोलिसांकडून सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. दर आठ तासांनी कर्तव्यावरील पोलीस कर्मचारी बदलत असल्याची माहिती आहे.

Police security at homes of Bachchu Kadu, Rajkumar Patel | बच्चू कडू, राजकुमार पटेल यांच्या घरांना पोलीस सुरक्षा

बच्चू कडू, राजकुमार पटेल यांच्या घरांना पोलीस सुरक्षा

Next
ठळक मुद्देराज्यात सत्ता संघर्षाचा परिणाम; धारणी, बेलोरा, कुरळपूर्णा येथे खडा पहारा

चांदूर बाजार/ धारणी : प्रहार जनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू आणि प्रहारचे आमदार राजकुमार पटेल हे दोघेही एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे कडू, पटेल यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने शनिवारी रात्रीपासून त्यांच्या घरांना पोलिसांकडून सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. दर आठ तासांनी कर्तव्यावरील पोलीस कर्मचारी बदलत असल्याची माहिती आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकण्यासाठी शिवसेनेतील बंडखोर व अपक्ष प्रयत्न करीत आहेत. बंडखोर आमदारांचे नेतृत्व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे करीत आहे. या घडामोडीत सहभागी झालेल्या जिल्ह्यातील प्रहार पक्षाच्या दोन आमदारांना सुरक्षा पुरविण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या बेलोरा येथील निवासस्थानी, चांदूर बाजार येथील प्रहार कार्यालय, तर कुरळ पूर्णा येथील निवासस्थानी पोलीस सुरक्षा पुरविण्यात आली आहे. प्रत्येकी चार पोलीस शिपाई येथे तैनात करण्यात आले आहेत.

या तिन्ही जागी नियंत्रण ठेवण्यासाठी एका पोलीस शिपायाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह आसामची राजधानी गुवाहाटी येथे मुक्कामाला असलेले मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या धारणी येथील घराला सुरक्षा पुरविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठाणेदारांना पोलिसांना नेमण्याचे आदेश दिले. त्यानुसार शनिवारी रात्रीपासून चार पोलीस शिपायांची ड्यूटी आमदारांच्या घरासमोर लावण्यात आली आहे. ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे यांनी ही व्यवस्था काही काळासाठी असल्याचे सांगितले.

बच्चू कडू घडामोडींमध्ये आघाडीवर

शिवसेनेतून बंड पुकारून ४० आमदारांना आपल्या गटात सामील करणारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत बच्चू कडू प्रसारमाध्यमांवर आघाडीवर असल्याचे दिसून येते. बच्चू कडू हे शिंदेसाठी राजकीय निर्णय घेताना सावलीसमान सोबत असल्याचे दूरचित्रवाणीवर बघायला मिळत आहे. त्यामुळे शिवसेना आमदारांनी बंड करण्याचा निर्णय हा फार पूर्वीपासूनच घेतला असावा, असे स्पष्ट होते.

'प्रहार'चे राजकीय वजन वाढले

राज्याच्या सत्तासंघर्षात प्रहार जनशक्ती पार्टीचे राजकीय वजन वाढले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात बच्चू कडू व राजकुमार पटेल यांना वेगळे स्थान मिळाल्याचे दिसून येते. कडू यांचा प्रहार पक्ष हा निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असल्याने पर्याय म्हणून बंडखोर आमदारांचा गट त्या दिशेने लक्ष ठेवून आहेत. या घडामोडीत बच्चू कडू हे 'हेवीवेट' नेते ठरले आहेत.

Web Title: Police security at homes of Bachchu Kadu, Rajkumar Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.