पोलिसांनी पकडले सव्वा तीन लाखांचे बैल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:12 AM2020-12-22T04:12:38+5:302020-12-22T04:12:38+5:30
अमरावती : दोन वाहनांतून नेण्यात येत असलेले ३ लाख १५ हजारांचे नऊ बैल वलगाव पोलिसांनी सतीनगर येथून जप्त केले. ...
अमरावती : दोन वाहनांतून नेण्यात येत असलेले ३ लाख १५ हजारांचे नऊ बैल वलगाव पोलिसांनी सतीनगर येथून जप्त केले. चालकाकडे या बैलांसंबंधी कुठलीही कागदपत्रे नव्हती. यामुळे पोलिसांनी वाहने जप्त करून त्यामधील तिन्ही चालकांना अटक केली. पोलीस सूत्रांनुसार, ठाणेदार आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वात वलगाव पोलिसांनी २० डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता सतीनगर मार्गावर तीन मालवाहू वाहने अडविली. एमएच ०३ एएच २९७३ क्रमांच्च्या वाहनातून दोन पांढरे व एक कबरा बैल जप्त करण्यात आला. हे वाहन मोहम्मद हारूण अब्दुल समद (४०, रा. खोलापूर) हा चालवित होता. एमएच ३७ बी १६०१ क्रमांकाच्या वाहनातून दोन लाल व एक पांढरा बैल काढण्यात आला. या वाहनाचा चालक अब्दुल सलीम अब्दुल जब्बार (३३, रा. पूर्णानगर) हा होता. एमएच २७ एक्स ५५९३ क्रमांकाच्या वाहनात दोन पांढरे व एक कबरा असे तीन बैल आढळले. हे वाहन अब्दुल नौशाद अब्दुल करीम (३५, रा. पूर्णानगर) हा चालवित होता. ८ ते १० वर्षाचे हे बैल लालखडी (अमरावती) परिसरातील पन्नीपुरा येथील शेख मुख्तार याच्या मालकीचे असल्याचे तिन्ही चालकांनी सांगितले. मात्र, त्यासंबंधी कुठलीही कागदपत्रे त्यांना देता आली नाही. वलगाव पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध ५ ए (१), ५ ए (२), ९ (बी), ११(१) (ड) प्राण्यास छळ प्रतिबंधक अधिनियम सहकलम १८४, १३०, १७७ मोटर वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंदविला. जप्त वाहनांची किंमत १० लाख ५० हजार रुपये आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक चंदन मोरे करीत आहेत.