राज्यात ५४ नवीन हॉस्पिटलमध्ये घेता येणार पोलिसांना उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 06:10 PM2018-08-19T18:10:40+5:302018-08-19T18:11:53+5:30
महाराष्ट्र राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह कुटुंबीयांच्या आजारपणात उपचार घेण्यासाठी पोलीस विभागांतर्गत नवीन ५४ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची यादी जाहीर झाली आहे.
अमरावती : महाराष्ट्र राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह कुटुंबीयांच्या आजारपणात उपचार घेण्यासाठी पोलीस विभागांतर्गत नवीन ५४ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची यादी जाहीर झाली आहे. त्यामध्ये उपचार घेण्याचा कालावधी एक वर्षापर्यंतच राहणार आहे.
राज्य सरकारने सन २००५ यावर्षी पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी कुटुंब आरोग्य योजना सुरू केली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व जिल्ह्यांतील महत्त्वाच्या हॉस्पिटलचा समावेश करण्यात आला होता. याचा फायदासुद्धा पोलीस विभागातील कुटुंबीयांनी घेतला. याच आधारे यावर्षीसुद्धा पोलीस विभागांतर्गत ५४ नवीन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये शासन निविदेत २७ आकस्मिक व ५ गंभीर आजारांचा समावेश करण्यात आला आहे. अमरावती, नांदेड, सोलापूर, नागपूर, पुणे, नाशिक, ओरंगाबाद, लातूर, सातारा यासारख्या मोठ्या जिल्ह्यांतील हॉस्पिटलचा समावेश आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना व कुटुंबीयांना या ५४ हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचा कालावधी हा ६ ऑगस्ट ते ३० जून २०१९ पर्यंत ठरविण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या योजनेचा लाभ सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळण्याच्या उद्देशाने अमरावती परिक्षतत्रांतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्यांच्या कार्यालयातील दर्शनी भागाच्या नोटीस बोर्डवर ५४ हॉस्पिटल्सची यादी लावण्याचे आदेश दिले आहेत.
- श्रीकांत तरवडे, पोलीस उपमहानिरीक्षक, अमरावती